गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करा, भरत गोगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:00 AM2019-08-12T03:00:32+5:302019-08-12T03:00:38+5:30
गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते खचले आहेत, नादुरुस्त आहेत त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश आमदार भरत गोगावले यांनी दिले.
बिरवाडी : गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते खचले आहेत, नादुरुस्त आहेत त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश आमदार भरत गोगावले यांनी दिले.
महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व त्यावर करावयाच्या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी आ. भरत गोगावले यांनी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली.
या वेळी तीनही तालुक्यांतील आरोग्य सेवेचा आढावा घेत साथीचे आजार सर्प, विंचू दंश यावर औषधोपचार उपलब्ध आहेत का? याची माहिती डॉ. भास्कर जगताप यांच्याकडून घेतली. महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडून पाणीपुरवठा व्यवस्था साफसफाईचा आढावा घेऊन जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन आ. गोगावले यांनी दिले.
महाड व पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या अखत्यारीत किती रस्त्यावरील वाहतूक बंद आहे, याबाबत विचारणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाचाड, निजामपूर, दहीवड, शेवते, वरंधभोर हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असून दोन दिवसांत अंदाजपत्रक तयार करून तत्काळ काम सुरू करण्यात येईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
दादली पुलावरील वाहतूक एसटी बस व स्कूल बसेससाठी सुरू करण्यात आली असून या पुलासह टोळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे कामाची वर्क आॅर्डर दोन दिवसांत देण्यात येईल असे सांगण्यात आले. यावर आ. गोगावले यांनी दादली पूल नव्याने करण्यासाठी आपला प्रयत्न असेल; परंतु त्यापूर्वी असणारा पूल सुस्थितीत राहावा यासाठी दुरुस्ती आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. या बैठकीसाठी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार पवार, डीवायएसपी अरविंद पाटील, पोलादपूरच्या तहसीलदार देसाई यासह सर्व खात्याचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गावे स्थलांतरित करण्याचे आदेश
महाड तालुक्यातील पारमाची गाव, बौद्धवाडी, आंबेशिवथर, आंबेनळीवाडी, कोथेर,ी जंगमवाडी यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचे आदेश आ. गोगावले यांनी प्रांताधिकारी यांना दिले. जिओच्या कामामुळे व रस्त्याला नाले नसल्याने रस्ते खचले असून यापुढे कोणतीही तडजोड नको, असे आदेश देत गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करावेत, असे आदेश आ. गोगावले यांनी दिले.