खोकरीच्या प्राचीन घुमटांची पुरातत्त्व खात्याकडून दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:50 PM2021-01-03T23:50:49+5:302021-01-03T23:50:56+5:30
मुरुडमधील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे शिल्प इतिहासप्रेमींचे आकर्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूड : येथील ऐतिहासिक स्थळांपैकी मुरुड-आगरदांडा रस्त्यावर ६ कि.मी. अंतरावर खोकरीचे गुंबज (गोल घुमट) वास्तुशास्राचा अजोड नमुना आहे. याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याकडून हाती घेण्यात आले आहे.
सारसेनिक शैलीचे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे शिल्प इतिहास प्रेमींचे आकर्षण आहे. भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना आहे. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियतखान व सिद्दी याकुतखान यांच्या या कबरी आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेले हे गुंबज आहेत. त्यापैकी सर्वात मोठे गुंबज हे सिद्दी सिरूलखानचे असून सिद्दी सिरुलखान जंजिऱ्याचा १७०७ ते १७३३ प्रशासक असल्याची ऐतिहासिक नोंद आहे, तर सिद्दी याकुतखान हा १६७० ते १६७७ व १६९६ ते १७०७ या कालावधीत तो जंजिऱ्याचा नबाब होता, तर सिद्दी खैरियत खान हा याकुतखानाचा भाऊ १६७७ ते १६९६ जंजिऱ्याचा प्रशासक असल्याचा उल्लेख सापडतो. या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे.
या ऐतिहासिक खोकरीचे गुंबज (गोल घुमट) याची दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याकडून हाती घेण्यात आले आहे. या वास्तू खूप उंच असल्याने, लोखंडी पाइपद्वारे पराची बनून या गोल घुमटाची स्वछता व दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी असंख्य कामगार तैनात करण्यात आले आहेत. हे काम खूप काळजीपूर्वक करण्यात येत आहे. या इमारतीचा कोणताही भाग कोसळू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. घुमटावर पावसाचा मारा झाल्याने काही भाग हा काळा पडला, तर वरील भागात शेवाळही पकडली आहे. यासाठी विशेष रसायनाचा वापर केला जात असून, या वास्तूची विशेष दक्षता घेतली जात आहे. स्थानिकांनी गोल घुमट काळा पडला असून, याची विशेष काळजी घेण्यात येऊन याचे दुरुस्तीचे व स्वछता करण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे, पुरातत्त्व खात्याने या गोल घुमटाकडे लक्ष दिले असून, दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. गोल घुमट वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असल्याने सदरील हे ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
या वास्तुसंदर्भात लोकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासाठी आम्ही लोकग्रहास्तव या वास्तुबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून, केमिकल ट्रीटमेंट करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे, पुरातत्त्व खात्याच्या केमिकल शाखेकडे हे काम सुपुर्द करण्यात आले आहे. केमिकल ट्रीटमेंटमुळे या वास्तूचे आयुष्यमान वाढणार आहे.
-बजरंग येलिकर, संवर्धक सहायक