गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणारा दिवेआगर-भरडखोल मार्ग पूर्णत: खड्डेमय बनला होता. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय पर्यटन दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने पर्यटक संताप व्यक्त करत असताना ‘लोकमत’ने याकडे लक्ष देत २७ डिसेंबर रोजी ‘दिवेआगर-भरडखोल रस्त्यावर खड्डे’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताची दखल घेऊन या मार्गाचे नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
श्रीवर्धन म्हटले की, विस्तीर्ण समुद्रकिनारा डोळ्यासमोर येतो. समुद्रकिनाºयालगत असणारा दिवेआगर- शेखाडी मार्ग हा पर्यटकांना वेळोवेळी भेट देताना आवर्जून पाहावासा वाटतो. या मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना सुखद आनंद देणारा ठरत आहे, त्यामुळे या रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गावरील दिवेआगर ते भरडखोल या अंतरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ‘नको असले पर्यटन’ असे म्हणत पर्यटक संताप व्यक्त करत होते. या सात किलोमीटरच्या अंतरावर पावलोपावली खड्डे दिसत होते.
कोकणातील पर्यटन तालुका म्हणून श्रीवर्धनची ओळख आहे. राज्यभरातून अनेक भाविक व पर्यटक हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, जंजिरा किल्ल्यावर तसेच या मार्गावर असणाºया भरडखोल व जीवना येथील प्रसिद्ध मासेमारी बंदर येथे नेहमीच ये-जा करतात. बोर्लीपंचतन या मुख्य शहरातून श्रीवर्धन तालुक्याच्या ठिकाणी शेखाडी या मार्गाने पोहोचता येते. श्रीवर्धन येथे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग असून, प्रस्तावित महामार्ग आहे. या मार्गावर एसटीच्या पाच ते सहा गाड्या रोजच धावतात. दिवेआगर, भरडखोल, शेखाडी, कोंडविल व आरावी बीच या रस्त्यालगत आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहनांची वर्दळ नेहमीच असते. मात्र, या मार्गाकडे वेळोवेळी दुर्लक्ष व्हायचे. या मार्गावर दिवेआगर गावापासून खड्डे पडल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असे. रस्त्यांची दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असताना वेळोवेळी रस्त्याबाबत समस्यांचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्तांची दखल घेऊन रस्त्याचे नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे.दिवेआगर-भरडखोल रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये नव्याने डांबरीकरण करण्यात येत असल्याने आम्ही समाधानी आहोत आणि या समस्येला चांगली प्रसिद्धी दिल्याने ‘लोकमत’चे आभारी आहोत. - दिनेश चोगले, सरपंच, भरडखोल