कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती
By admin | Published: June 13, 2017 02:55 AM2017-06-13T02:55:10+5:302017-06-13T02:55:10+5:30
पोलादपूरपासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मोरीचे बांधकाम करताना २००५ मध्ये ब्लास्टिंग झाल्याने संपूर्ण मोरीवरील रस्ता सातत्याने खचण्याचा प्रकार दरवर्षी
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : पोलादपूरपासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मोरीचे बांधकाम करताना २००५ मध्ये ब्लास्टिंग झाल्याने संपूर्ण मोरीवरील रस्ता सातत्याने खचण्याचा प्रकार दरवर्षी सुरूच आहे. २०१२ मध्ये तीन वेळा मलमपट्टी तर २०१३ मध्ये पुन्हा या ठिकाणी रस्ता दुरुस्ती केल्यानंतरही प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खचत असल्याने कशेडी घाट धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यंदा महामार्ग सार्वजनिक विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीच कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग आला असून राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
भोगाव गावच्या हद्दीत कशेडी घाटातील या मोरीच्या बांधकामात ब्लास्टिंग प्रकारामुळे परिसरात लाल माती कातळापासून सैल झाल्याने आणि लाल मातीचे स्लायडिंग झाल्याने २००५ पासून येथे साधारणत: ९० ते १२५ मीटरपेक्षा जास्त लांब आणि अडीच ते तीन फूट खोल रस्ता दरवर्षी खचण्याचा प्रकार होत आहे. मात्र संबंधित खात्याकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. २०१२ मध्ये एप्रिल महिन्यात दोन दिवस मेगाब्लॉक करून रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून यंदा ही महामार्ग सार्वजनिक विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीच कशेडी घाटातील खचलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे कशेडी घाटातील यंदाच्या पावसाळ्यातील खचलेल्या रस्त्यावरील प्रवास सुखकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून वाया घालविण्यापेक्षा येथेच रस्त्याला समांतर पूल बांधल्यास यापुढे कायमस्वरूपी उपाय होवून रस्ता खचल्याने वाया जाणारा सरकारी खर्च वाचणार आहे असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.