नवाबकालीन इमारतीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:29 AM2018-04-30T03:29:51+5:302018-04-30T03:29:51+5:30
मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर एकेकाळी नवाबांचे राज्य होते. मुरुड येथील नवाबाच्या राजवाड्यातून या तिन्ही तालुक्यांचा कारभार चालत असे.
मुरु ड जंजिरा : मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर एकेकाळी नवाबांचे राज्य होते. मुरुड येथील नवाबाच्या राजवाड्यातून या तिन्ही तालुक्यांचा कारभार चालत असे. सर सिद्धी अहमद खान हे जंजिऱ्याचे पहिले नवाब आहेत. त्यांचा कालखंड १८८३ ते १९२२ असा होता. त्यांच्या कालावधीतच मुरु ड येथे आलिशान राजवाडा बांधण्यात आला आहे.
राजवाड्याबरोबरच तिन्ही तालुक्यांचा कारभार चालवण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतसुद्धा बांधण्यात आली होती. मुख्य राजवाड्याचे कोरीव बांधकाम दगडांचे आहे; परंतु मुख्य प्रशासकीय इमारत विटांच्या व चुना व रेती यांच्या साह्याने बनवल्यामुळे आज तिची दुरवस्था झाली आहे.
१०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने इमारत जीर्ण झाली असून ढासळत आहे. त्यामुळे सध्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जुनी वस्तू जशी होती, तसेच बांधकाम सध्या करण्यात येत आहे.
इमारतीवरीवरील कौले, तुटलेल्या रिपा दुरु स्त करून पुन्हा नव्या स्वरूपात कौले बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच मुख्य इमारतीला प्लास्टर मारून तिचे गतवैभव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे लवकरच मुख्य प्रशासकीय इमारतीचीही शोभा वाढणार आहे.