पाताळगंगा पुलाची दुरवस्था; वाहतूक मंद गतीने होत असल्याने कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:21 PM2019-09-10T23:21:22+5:302019-09-10T23:21:38+5:30
खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान । प्रवासी त्रस्त; चालक हैराण
राकेश खराडे
मोहोपाडा : औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पाताळगंगा पुलाची बिकट अवस्था झाली असून या पुलाला जागोजागी खड्डे पडून काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स व शिगा बाहेर आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सायंकाळनंतर दुचाकी चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आपटून अपघात होत आहेत. पुलाची याअगोदर अनेकदा थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती, परंतु पावसाळा सुरू झाला की परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.
हा पूल बांधून ३६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले असून पुलावर उभे राहिल्यास वाहन जात असताना पूल दुभंगला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाचा भाग खचल्याने अवजड वाहन पाताळगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली होती. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. पाताळगंगा क्षेत्राकडे दांड-रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरुन दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. या पुलाला पर्याय म्हणून दुसºया पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या रहदारीसाठी जुन्याच पुलाचा वापर होत असल्याने या पुलावरून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी जुन्या पुलाचे काम करुन भविष्यातील धोका टाळावा तसेच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
कायमस्वरूपी काम करण्याची मागणी
औद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाताळगंगा हा एकमेव पूल असून या रस्त्यावरुन शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. पाताळगंगा पुलाची दुरवस्था होवून लोखंडी प्लेट्स ,स्टील रॉड बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होवून अपघात होत आहेत. खड्ड्यात वाहन आदळल्याने काहींना कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी येथून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
दुचाकीस्वार त्रस्त
या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर एखादे मोठे वाहन या पाण्यातून गेले तर दुचाकीवरून आलेल्या वाहन चालकाच्या अंगावर हे साचलेले पाणी उडत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना जपून जावे लागत आहे.