खोपोली : खोपोली शहरातील सुभाष नगर रहिवासी वसाहतीत मोठी लोकवस्ती असून, तेथील रस्ता महिंद्रा कंपनीच्या कॉलनीतून आहे. तो रस्ता दुरुस्त करण्याऐवजी पालिकेने नव्या पर्यायी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले आहे. मात्र, त्यामुळे नाराजी नागरिकांच्या नगरपालिकेत धाव घेत आमचा ५० वर्षांपासूनचा वर्दळीचा रस्ता सुधारा, पर्यायी मार्ग आम्हाला नको, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
उंच टेकडीवर महिंद्रा कंपनीला लागून ५० वर्षांपासून मोठी लोकवस्ती आहे. १९८५ मध्ये माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव निवडून आले. तेव्हा पहिल्यांदा रस्ते, पथदिवे व्यवस्था केली गेली. सुभाषनगरमधील रहिवाशांनी नवीन रस्त्याची कोणतीही मागणी न करता पालिकेने कंपनीच्या हितासाठी ठराव मंजूर करीत आदिवासी वसाहतीपासून सुभाषनगरपर्यंत नव्या रस्त्याचे काम मंजूर केले. याबाबतची नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामाचे भूमिपूजन केले.
नवा रस्ता तयार करून सध्या सुरू असलेला रस्ता बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा डाव तर नाही ना? अशी शंका सुभाष नगरवासीयांकडून व्यक्त होत आहे आणि या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांना भेटून रस्त्याचे काम थांबवा, अशा विनंतीचे निवेदन दिले.
या वेळी अशोक गिलबिले, दत्ता नेहरे, राहुल जाधव, फारुख शेख, गुकुल सोनवणे, मल्हारी चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, फरीद शेख, प्रलाद बटेवर, सुंदर शर्मा, सीताबाई आडकर, वंदना ओव्हाळ, शोभा माळी, सविता गिलबिले यांच्यासह बहुसंख्य नागरिक व महिलावर्ग उपस्थित होते.