खर्डी गावात श्रमदानातून शाळेची दुरुस्ती; तरुणांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:31 AM2020-05-25T00:31:34+5:302020-05-25T00:31:45+5:30
रायगड जिल्हा परिषदेची शाळा
दासगाव : फौजी प्रशांत गोविंद राजेमहाडीक व फौजी प्रशांत भरत राजेमहाडीक यांच्या पुढाकाराने लॉकडाउन काळामध्ये सर्व तरुणांना एकत्र आणत ग्रामपंचायतीने राबविलेले अनेक उपक्रम पूर्णत्वास गेले असून मोडकळीस आलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे कामही श्रमदानातून करण्यात आले. जवळपास ६० वर्षांनंतर शाळा दुरुस्ती करण्यात आली आहे. वारंवार दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला. मात्र, अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
महाड तालुक्यातील खर्डी गावात लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्स राखत श्रमदानातून विविध कामे मार्गी लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात आली. जवळपास ६० वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना झाली असून या इमारतीच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले होते. यामुळे अखेर ग्रामस्थांनी या शाळेची दुरुस्ती हातात घेऊन श्रमदान केले. याचबरोबर गटाराचे खोदकाम करून बांधकाम केले.
विहिरीतील गाळ काढून विहिरीचे बांधकाम केले, बंधारामधील गाळ काढणे, साफसफाई करणे, आदी कामेही श्रमदानातून करण्यात आल्याचे सरपंच संदेश महाडीक यांनी सांगितले. उपसरपंच विजय महाडीक, तंटामुक्त अध्यक्ष वसंत महाडीक सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक
प्रमोद तरे, शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती गावंड, खर्डी शिवसेना पक्षाचे
सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.