अलिबाग : तालुक्यातील धेरंड-शहापूरसह जिल्ह्यातील खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून घेऊन स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर संरक्षक बंधारे फुटून भातशेतीची होणारी नुकसानी नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करणार, अशी ग्वाही राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा रायगड जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिली आहे.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बुधवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केलेली समुद्र संरक्षक बंधारे फुटून सुमारे ६००० एकर भातशेतीची झालेली नुकसानी आणि सातत्याने उधाणाच्या आपत्तीची असलेली समस्या चर्चेस आल्यावर पालकमंत्री चव्हाण यांनी ही ग्वाही दिली. शासकीय यंत्रणेने मिशन मोडमध्ये काम करावे, असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्याकरिता सक्रिय राहणार आहे. आज पहिलीच आढावा बैठक झाली. त्यामध्ये अधिकारी वर्गाकडून सद्यस्थिती जाणून घेतली आहे. येत्या काळात आवश्यक ते बदल करून विकासकामे पूर्ण केली जातील. आपल्या सर्वांच्या सहयोगातूनच हे प्रश्न सुटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची अवस्था दयनीय झाली असून अनेक योजना अपूर्ण असतानाही ठेकेदारांना बिले दिली गेली आहेत. प्रत्यक्षात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. या समस्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ पाणीपुरवठा योजनांचे सद्यस्थितीतील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास दिले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आ. प्रशांत ठाकूर, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, माजी आमदार देवेंद्र साटम, तसेच शासनाचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.डॉक्टरांसाठी नवीन कायदा लागू करणारजिल्ह्यातील आरोग्यसेवा योग्य प्रकारे काम करीत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध नसतात. या समस्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण म्हणाले, जे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आपल्या आरोग्यसेवेत येतात, ते पुढील शिक्षणाकरिता जातात ते परत येत नाहीत.ग्रामीण भागात डॉक्टर राहायला तयार होत नाहीत. ही राज्यभरातील समस्या आहे. डॉक्टर पदवी घेणाºया नवीन डॉक्टरांकरिता नवा कायदा राज्य सरकार लवकरच आणत आहेत. त्यातून ही समस्या सुटणार असल्याचे स्पष्ट केले.जिल्ह्यातील रुग्णालयांना डायलेसिस मशिन मुंबईतील एका न्यासाच्या माध्यमातून देऊ करण्यात आली आहे, ती कार्यान्वित करण्याकरिता आरोग्य विभागाच्या माध्यमातून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.रायगडच्या आरोग्य व्यवस्थेतील बदलाकरिता ‘आॅपरेशन कायापालट’ हाती घेण्यात आले असून, त्या अंतर्गत आरोग्य व्यवस्थेतील कमतरतांचा अहवाल अखेरच्या टप्प्यात आहे. या कमतरता दूर करण्याकरिता जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सहयोगातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०१८अखेर पूर्ण होणारमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कामाच्या कंत्राटदारामध्ये बदल करण्यात आला असून हे काम गतिमान झाले आहे. इंदापूर ते पोलादपूर या टप्प्यातील रुंदीकरणाकरिता आवश्यक जमिनीपैकी ९७ टक्के जमीन संपादन करून रुंदीकरणाकरिता प्रत्यक्ष ताब्यात देण्यात आली आहे. पळस्पे (पनवेल) ते पोलादपूर या टप्प्यातील महामार्गाचे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सानेगाव आदिवासी आश्रमशाळा प्रदूषणाची चौकशीसानेगाव येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना शेजारील इंडो एनर्जी बंदरावरील दगडी कोळशाच्या वाहतुकीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित विभागांना याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. रायगड किल्ला संवर्धन योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. पुरातत्त्व विभाग व अन्य यंत्रणांच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होईल, असे सांगितले.
बंधा-यांच्या दुरुस्तीची कामे रोहयोतून, पालकमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:25 AM