माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:22 AM2020-01-06T00:22:38+5:302020-01-06T00:22:44+5:30
गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे ...
गिरीश गोरेगावकर
माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे पाणीदेखील मिळणे मुश्कील झाले आहे. तसेच शौचालयही अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. याकडे येथील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. माणगाव एस.टी. स्थानकातील पाणपोईची दुरवस्था झाली असून, अनेक प्रवासी या पाणपोईचा वापर तंबाखू व पान खाऊन पिचकाºया मारण्यासाठीच करतात. गेले अनेक दिवस ही पाणपोई बंद आहे. एस.टी. महामंडळाने ही पाणपोई सुरू करावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी आहे.
एसटी ही ग्रामीण भागाचा आधार आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंतापासून ते दुर्गम भागातील नागरिक प्रवासासाठी एसटीला पसंती देतात. उशिरा जाईन; पण एसटीनेच जाईन, अशी साधारण सर्वांची मानसिकता आहे. मात्र, प्रत्यक्षात याच एसटीची आणि बसस्थानकांची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याते मूलभूत सोयी सुविधांची वानवा असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.
माणगाव येथील एसटी स्थानकात अनेक गैरसोयी आहेत. स्थानकातील पंखे सुरू नाहीत. शौचालय व मुतारीची दुरवस्था आहे. तेथे नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते. तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता न केल्याने काही जण बाहेरच लघुशंका करतात. त्यामुळे या परिसरात उग्र दर्प सातत्याने येत असतो. तसेच स्थानकाच्या छताला पाण्याची गळती सुरू असून छताचा काही भाग कोसळून उघडा पडलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात छत्री उघडून आणि जीव मुठीत धरून बसावे लागते.
>पाणपोई बंद
माणगाव बसस्थानकात यापूर्वी जैन समाज, माणगाव मेडिकोज आणि बसस्थानकात पाणपोई सुरू करून प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले होते. कालांतराने पाच वर्षांपूर्वी यातील दोन पाणपोई बंद झाल्या.
या पाणपोई देखभाल व दुरुस्ती न केल्याने या पाणपोई बंद झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.
बसस्थानकाचे नळाद्वारे पिण्यास असणारे पाणी हे शुद्धीकरण न करता प्रवाशांना मिळत होते. ते पाणी आता बंद झाल्याने त्यांना बाजारातील विक्रीस असणाºया पाण्याच्या बाटल्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
स्थानकातील पाणपोईमध्ये लोकांनी पान, तंबाखू यांच्या पिचकाºया मारून तो भाग रंगबिरंगी केले आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी येत असल्याने कोणीही जात नाही. तसेच येथे पाणपोईजवळ कचराही साठविला जात असल्याने दुर्गंधी येते. या स्थानकातील उर्वरित दोन पाणपोई सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली होती. मात्र, त्या आद्यपही सुरू झालेल्या नाहीत.
>बस स्थानक हे प्रवाशांसाठी असताना या स्थानकात फेरी (फिरता व्यवसाय)चा पास काढतात. मात्र, हे व्यावसायिक स्थानकाच्या व्हरंड्यामध्ये आपला व्यवसाय टेबल वा गाडी लावून करताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना तिथे वावरताना त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.