कर्जतमध्येही मिळणार रेल्वे प्रवासाच्या आरक्षित तिकिटांचे पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:11 AM2020-06-20T00:11:11+5:302020-06-20T00:11:25+5:30
लॉकडाऊनमधील प्रवासाचे तिकीट; आजपासून तिकीट रद्द करण्यास प्रारंभ
कर्जत : लॉकडाऊन काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत आणि त्यांना रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत होते. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून यासाठी प्रयत्न केले जात होते. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या प्रयत्नांना यश आले असून, कर्जत रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडकीवर शनिवार, २० जूनपासून तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
लॉकडाऊनमुळे प्रवाशांना त्यांनी केलेल्या आगाऊ नोंदणीनुसार प्रवास करता आला नाही. त्यात रेल्वेकडून आरक्षण तिकिटे रद्द करून देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, कर्जत, खोपोली ते भिवपुरी, नेरळ, वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकिटे रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील प्रवासी तिकिटे रद्द करण्यासाठी बदलापूर येथे जाऊन रद्द करीत आहेत. त्यात रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी बदलापूर येथे स्वत:चे वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी किमान कर्जत येथे तरी आरक्षित तिकिटे रद्द करण्याची सुविधा सुरू व्हावी, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडे करण्यात येत होती. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून रेल्वे प्रशासनास सदर समस्येबाबत कळवून कर्जत रेल्वे स्थानकातील आरक्षण तिकीट खिडकी आरक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी सुरू करण्याची विनंती केली होती. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केलेल्या विनंतीची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन कर्जत रेल्वे स्थानकातील आरक्षण तिकीट खिडकी आरक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. कर्जत येथे रेल्वे स्थानकात असलेल्या संगणकीय आरक्षण केंद्रात रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्द करण्यासाठी २० जूनपासून खिडकी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्येची दखल घेऊन कर्जत रेल्वे स्थानकातील आरक्षण तिकीट खिडकी सुरू करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
तिकिटांचा परतावा तारखेप्रमाणे मिळणार
२२ मार्च ते १५ मे पर्यंत प्रवासाची तारीख असणाºया प्रवाशांना २० जूनपासून
१६ मे ते ३० मे पर्यंत प्रवासाची तारीख असणाºया प्रवाशांना २१ जूनपासून
१ जून ते ३० जूनपर्यंत प्रवासाची तारीख असणाºया प्रवाशांना २८ जूनपासून
तसेच कोणीही प्रवासी वरील तारखेपर्यंत काही कारणास्तव येऊ शकला नाही, तर त्यांना प्रवास तारखेच्या सहा महिन्यांपर्यंत परतावा मिळू शकणार आहे.
‘कर्जत रेल्वे स्थानकाच्या आरक्षण केंद्रावर लॉकडाऊन काळात प्रवास करता आला नाही. त्या प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवाशांनी त्या-त्या वेळी येऊन आपले पैसे परत घ्यावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून सहकार्य करावे. उगाच गर्दी करू नये.’
- आर. के. भारद्वाज, व्यवस्थापक, कर्जत रेल्वे स्टेशन
'आरक्षित तिकिटाचा परतावा मिळविण्यासाठी कर्जतकरांनी तिकीट खिडकीवर गर्दी करू नये. ३० जूनपर्यंत प्रवासाचा आरक्षित तिकिटांचा परतावा, प्रवास तारखेच्या ६ महिन्यांपर्यंत मिळू शकणार आहे.'
- पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता