साऊथ अफ्रिका,ओमान देशातून आलेले नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह; रायगडमध्ये चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 04:34 PM2021-12-17T16:34:19+5:302021-12-17T16:34:43+5:30
माणगाव आणि खारघर येथे सापडले दोन रुग्ण; राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले नमुने
- आविष्कार देसाई
रायगड- जिल्ह्यात साऊथ अफ्रिका आणि ओमान देशातून आलेल्या दोन प्रवाशांना काेराेनाची लागण झाल्याचे तपासणीत समाेर आले आहे. माणगाव आणि खारघर या ठिकाणी हे दाेन्ही रुग्ण वास्तव्यास आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना आेमायक्राॅनची लागण झाली आहे का हे स्पष्ट हाेणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आेमायक्राॅन हातपाय पसरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे.
आेमायक्राॅनचा पहिला रुग्ण साऊथ अफ्रिकेत सापडला हाेता. त्यानंतर आेमायक्रानचा जगभर वेगाने प्रसार झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ३३३९ नागरिक परदेशातून आले आहेत.(रायगड ग्रामिणमध्ये १६०४ आणि पनवेल महपालिका हद्दीत १५३५) परदेशातून आलेल्या २५१९ नागरिक ट्रेस करण्यात आले आहे. (रायगड ग्रामिणमध्ये १३५२ आणि पनवेल महपालिका हद्दीत ११९७)परदेशातून आलेल्या १८७९ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ९०८ रायगड ग्रामिणमधील तर ९७१ पनवेल महापालिका हद्दीतील आहेत. पैकी रायगड ग्रामिणमध्ये माणगाव तालुक्यात एक आणि पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे एक अशा दाेन नागरिकांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्याती चिंता वाढली आहे.
रायगड ग्रामिण भागातील माणगाव येथे आेमान राष्ट्रातून महिला आली आहे. तीचे वय २५ वर्ष आहे. तीच्या साेबत अन्य दाेन व्यक्ती हाेत्या. या महिलेने फायझर कंपनीचे दाेन्ही डाेस घेतले आहेत. पहिला डोस १९ जुन २१ तर दुसरा डोस ८ आॅगस्ट २१ रोजी घेतला आहे. सदरची महिला पाच महिन्यांची गराेदर आहे. सात दिवसांनंतर तीची आरटीपीसीआर टेस्ट केल्यावर ती काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे आलेली व्यक्ती हा पुरुष आहे. त्यांचे वय ४८ आहे. साऊथ अफ्रिका नंतर युके असा प्रवास करत भारतात आला आहे. त्यांनीही काेव्हिशिल्डचे दाेन्ही डाेस पूर्ण केलेले आहेत.
पहिला डोस ६ एप्रिल २१ तर दुसरा डोस १८ जुलै २१ रोजी घेतला होता. त्याची सात दिवसांनतर आरटीपीसीआर तपासणी केल्यावर काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. दाेघांचेही नुमने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच आेमायाक्राॅनची लागण झाली आहे का हे स्पष्ट हाेणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २० जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
दरम्यान, परदेशातून आलेल्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी क्रिसमस, थर्टीफस्ट डिसेंबरचे सेलिब्रेशन जरा जपूनच करावे, मास्क, सामाजिक अंतर, सॅनेटाईजरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.