‘त्या’ उमेदवारांचे प्रतिनिधी १२ तासांच्या आत हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:36 AM2019-04-20T05:36:11+5:302019-04-20T05:36:28+5:30
अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघे उमेदवार १२ तासांच्या आत रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर झाले.
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघे उमेदवार १२ तासांच्या आत रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर झाले. हे दोघे ११ एप्रिल २०१९ पासून बेपत्ता असल्याची बातमी ‘लोकमत’ने शुक्रवारी उघड केली होती.
दोन्ही अपक्ष उमेदवार तटकरे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी, शनिवारी होणाऱ्या बैठकीत हजर राहून हिशेब दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती उमेदवार निवडणूक खर्च ताळमेळ समितीच्या प्रमुख डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या दोघांना ११ एप्रिलपासून बेपत्ता असल्यामुळे रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कडक कारवाई करण्याची नोटीस गुरुवारी बजावली. या पार्श्वभूमीवर दोन्ही अपक्ष उमेदवार तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटीवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्याशी संपर्क झाला, ते म्हणाले, रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची एक नोटीस मिळाली आहे.
ती कधीची आहे हे पाहवे लागेल. आपला खर्च सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी निवडणूक प्रतिनिधी कार्यालयात गेलो होते, अशी माहिती अपक्ष उमेदवार सुनील पांडुरंग तटकरे यांनी दिली. मात्र, ११ एप्रिलपासून कुठे होतो, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, दुसरे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळआळी, ता. म्हसळा, जि. रायगड) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.