पेणमध्ये प्रतिष्ठेच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:47 AM2018-05-18T02:47:39+5:302018-05-18T02:47:39+5:30
पेण तालुक्यातील ७ मोठ्या व प्रतिष्ठा असलेल्या ७ ग्रा. पं. मधील सरपंचाच्या ७ जागांसाठी २३ उमेदवार थेट निवडणुकीसाठी सज्ज झाले
- दत्ता म्हात्रे
पेण : पेण तालुक्यातील ७ मोठ्या व प्रतिष्ठा असलेल्या ७ ग्रा. पं. मधील सरपंचाच्या ७ जागांसाठी २३ उमेदवार थेट निवडणुकीसाठी सज्ज झाले असून सर्वात मोठी व उत्पन्नाचे अधिक स्रोत असलेली वडखळ ग्रा. पं.मधील थेट सरपंच निवडणुकीसाठी ६ उमेदवार, बोरी २, वाशी २, तरणखोप ३, बळवली ३, दिव ४, दुष्मी-खारपाडा ३ असे २३ उमेदवार थेट सरपंच निवडणुकीसाठी सज्ज झाले असून प्रत्येक ग्रा. पं.मध्ये होणाऱ्या दुरंगी व तिरंगी लढती प्रेक्षणीय तसेच मतदारांचे श्वास रोखून धरणारे निकाल या लढतीमधून पहावयास मिळतील. याचे महत्त्वाचे आजी-माजी सभापतीपद उपभोगलेले, तसेच पेण पं. स. च्या सदस्यपदावर विद्यमान सदस्यपद सांभाळणारे असे मोठे प्रस्थ सरपंच पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दंड थोपटून उभे राहिल्याने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणाºया या लढती क्षणाक्षणाला राजकीय समीकरण बदलण्यास भाग पाडतील असा या ग्रा. पं. चा राजकीय इतिहास आहे. तर सदस्यांच्या ६९ जागांकरिता १७४ उमेदवारांचे भवितव्य या सरपंचाच्या नावावरून मतदार ठरवतील अशीही राजकीय चर्चा सुरू आहे.
पेणच्या सर्वात उत्पन्नाचे मोठे साधन असलेल्या वडखळ ग्रा. पं. आर्थिक उलाढाल वर्षाकाठी १ ते १.५० कोटीच्या घरात आहे. जेएसडब्लू कंपनीचा क न्व्हेअर बेल्ट व मालवाहू धरमतर जेट्टी वडखळ ग्रा. पं. कार्यक्षेत्रात येते. कंपनीमध्ये ठेकेदार म्हणून कामधंदा करणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रा. पं. मध्ये सदस्य का होईना आपली उमेदवारी असावी, ही प्रत्येकाची इच्छा. त्यात गैर असे काहीही नाही. लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत घटनेनेच तो प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे. त्यानुसार वडखळ ग्रा. पं. मध्ये राजेश मोकल, नीलेश म्हात्रे व प्रभाकर म्हात्रे असे तिघांचे पॅनेल एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवित असून गेल्या दशकभराचे चित्र पाहता एकत्रित काम करणारी ही मंडळी आता सरपंच पदाची खुर्ची हस्तगत करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. याशिवाय सरिता म्हात्रे, मुके श जांभळे व मारुती म्हात्रे हे तीन सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवारही निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. या ठिकाणी विनोदिनी कोळी या अनुसूचित जमाती या आरक्षित जागेवर बिनविरोध निवडून आल्या असून कोळवे गावच्या या भगिनीचे तीनही पॅनेलच्या सरपंच उमेदवारांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे. १४ जागा व सरपंचाच्या थेट निवडीसाठी पाच प्रभागातील पडधड ते ५ हजार मतदारांचा कौल कोणत्या भाग्यवान सरपंच उमेदवाराकडे झुकतो, हे येत्या पाच-सहा दिवसात चित्र स्पष्ट होईल. वडखळ ग्रा.पं.वर पूर्वापार मोकल घराण्याची सत्ता चालत आली आहे. झेडपीचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती कै. मोरेश्वर मोकल यांनी सरपंच पदाबरोबरने वडखळ झेडपी मतदार संघातही आपला राजकीय ठसा उमटविला होता. त्यांची पुढची पिढी हा वारसा चालवित आहे. मात्र या नव्या दमाच्या तरुणाईला आता वडखळमधूनच नीलेश म्हात्रे व प्रभाकर म्हात्रे यांचे आव्हान निर्माण झाले आहे. प्रारंभी एकत्रित टीमवर्कने काम करणारे हेच तीन पॅनेलमधील उमेदवार व त्यांच्या साथीदारामध्ये फाटाफूट होवून सरपंच निवडणूक प्रतिष्ठेची केली. तीनही पॅनेल राजकीयदृष्ट्या मातब्बर असून मतदारांना आता प्रश्न पडला आहे, अशी उत्कंठा वाढविणारी वडखळ ग्रा. पं. तिरंगी लढतीचे वैशिष्ट्य आहे.
उर्वरित बोरी ग्रा.पं.मध्ये प्रतिभा म्हात्रे विरुद्ध संगीता म्हात्रे अशी दुरंगी लढत. अविनाश म्हात्रे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून दहा वर्षे तसेच बोरी सरपंचपदाची जबाबदारी दहा वर्षे सांभाळून आपल्या घराण्याकडे सरपंचपद कायम ठेवण्यास प्रयत्नशील असून त्यांना थेट आव्हान देण्यासाठी या ठिकाणी इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दंड थोपटून उभे आहेत. या ठिकाणी अविनाश म्हात्रे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून विजयाची समीकरणे कशी तयार करायची याबाबतीत त्यांना चांगला अनुभव आहे. मात्र लढतीचे चित्र फेस टू फेस असल्याने ही दुरंगी लढत चुरशीची ठरणार आहे.
वाशी ग्रा.पं.मध्ये संदेश ठाकूर विरुद्ध गोरखनाथ पाटील अशी दुरंगी लढत आहे. वाशी, ओढांगी व सरेभाग असे तीन गाव मिळून वाशी ग्रा. पं. चे कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणी ओढांगी गावाने एकमताने ३ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. संदेश ठाकूर याच प्रभागातील सरपंच उमेदवार असल्याने प्रभाग ४ मधील तब्बल ९४२ मतदारांमधील बहुतांश मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळेल, उर्वरित वाशी व सरेभागमधील इतर प्रभागात या दोन्ही उमेदवारात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. एकूण ११ जागांपैकी ३ जागांचा निकाल लागल्याने ८ जागा व थेट सरपंच निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
दिव ग्रा. पं. जयप्रकाश ठाकूर, विवेक म्हात्रे व मंगलदास ठाकूर असा तिरंगी सामना रंगणार असून जयप्रकाश ठाकूर यांनी शेकापच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापतीपद उपभोगले आहे. दिव सरपंच म्हणून ही पदभार सांभाळला आहे. त्यांना विवेक म्हात्रे या युवा तरुणाने आव्हान निर्माण केले आहे. दोघेही शेकाप कार्यकर्ते असून यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचे मंगलदास ठाकूर यांनीही आपले राजकीय अस्तित्वासाठी उमेदवारी भरून चांगले आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे दिव ग्रा. पं. निवडणूकही उमेदवारांना घाम फोडणारी निवडणूक मतदारांच्या मनातील सरपंच कोण यावर अवलंबून राहणार आहे.
दुष्मी-खारपाडा ग्रा. पं. मध्ये माजी पेण पं. स. सभापतीपद सांभाळणारे चंद्रकांत घरत व कै. मोरेश्वर भगत यांच्या घरामधील उमेदवार अनुक्रमे नेत्रा घरत विरुद्ध रश्मी भगत असा राजकीय प्रतिष्ठेचा सामना आहे. त्यांना भाजपाचे रामशेठ घरत यांची कन्या प्रिया घरत यांचे आव्हान आहे. यामध्ये कोणता उमेदवार भाग्यवान ठरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आघाडी विरुद्ध राष्टÑवादी विरुद्ध भाजपा असा राजकीय प्रतिष्ठेचा सामना असून बाजीगर कोण ठरणार याची उत्सुकता राजकीय चर्चेचा विषय आहे.
बळवली ग्रा.पं. शेकापचे संजय डंगर विरुद्ध शिवसेना-काँग्रेस आघाडीचे राजू पाटील व भाजपाचे भाऊ पाटील असा तिरंगी सामना आहे. पेण तालुका शेकापसह चिटणीस म्हणून संजय डंगर तर राजू पाटील शिवसेनेचे पेण तालुका पदाधिकारी आहेत. मुख्य लढत या
दोघांमध्येच होणार असून चुरशीची ठरणार आहे. तरणखोप ग्रा. पं. मध्ये शेकाप झेडपी सदस्य डी. बी. पाटील यांच्या घरातील दीपिका पाटील विरुद्ध अभिजित पाटील यांच्यातच मुख्य लढत आहे.
शेकापला कडवे आव्हान देणारे अभिजित पाटील यांना शिवसेना व काँग्रेस आघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे शेकापचे झेडपी सदस्य व कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद सांभाळणारे डी. बी. पाटील यांना तरणखोप सरपंचपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. या ठिकाणी तिरंगी लढत असली तरी सामना मात्र दीपिका व अभिजित पाटील यांच्यातच रंगणार आहे.
>भार्जे ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अनसूया पवार यांची बिनविरोध निवड
राबगाव/पाली : सुधागड तालुक्यात सध्या १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता ७ ते १२ मे या कालावधीत नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली असून २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाºया भार्जे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अनसूया दौलत पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवडून आणण्याचा करिश्मा राष्ट्रवादीचे सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे यांनी केला आहे.
भार्जे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा बिनविरोध सरपंच बसविण्याकरिता माजी सरपंच राम उफाळे,यंगस्टर्स मंडळाचे उपाध्यक्ष राम दळवी, गणपत चव्हाण, सखाराम आयरे, अनिल पिंगळे, किसन वाघमारे,गणपत पवार, हरिचंद्र पवार, सुरेश पवार, यशवंत वाघमारे, किसन वाघमारे, पांडू वालेकर, दौलत पवार, विठोबा पवार, श्रावण कोळी, वसंत पवार, धोंडू पिंगळे, सूर्यकांत राजीवडे, शिवराम ठाकूर, महादू खंडेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले की, आमचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली व गीताताई पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १0 ते १५ वर्षात भार्जे ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासकामे व तेथील ग्रामस्थांची छोटी-मोठी वैयक्तिक कामे आम्ही कायम करीत आलो असल्याने आम्ही येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करू शकलो असे साळुंखे यांनी सांगितले.