‘चंदेरी’वर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका, ट्रेकिंगसाठी गेले आणि रस्ताच विसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:17 AM2024-01-30T09:17:42+5:302024-01-30T09:17:59+5:30

Chanderi Fort: पुण्यातील चार पर्यटक रविवारी पनवेल हद्दीतील मालडुंगे ग्रामपंचायत येथील चंदेरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र, त्यांना तेथील रस्ता माहिती नसल्यामुळे ते अडकले.

Rescue of four tourists stuck on 'Chanderi', went for trekking and forgot the road itself | ‘चंदेरी’वर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका, ट्रेकिंगसाठी गेले आणि रस्ताच विसरले

‘चंदेरी’वर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका, ट्रेकिंगसाठी गेले आणि रस्ताच विसरले

- मयूर तांबडे
नवीन पनवेल - पुण्यातील चार पर्यटक रविवारी पनवेल हद्दीतील मालडुंगे ग्रामपंचायत येथील चंदेरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र, त्यांना तेथील रस्ता माहिती नसल्यामुळे ते अडकले. या सर्व पर्यटकांना स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने डोंगरावरून खाली उतरविण्यात यश आले आहे. 

ऋषभ भगवान वैराट (२७),  प्रसाद मारुती दगडे (२५), नवनाथ बाबासाहेब खुडे (२७),  प्रशांत महादू विडे (३५) अशी अडकलेल्या पर्यटकांची नावे असून, ते पुण्याच्या बावधन गावात राहणारे आहेत. २८ जानेवारीला सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास काही तरुण येथे ट्रेकिंगसाठी आले होते. डाेंगरावर अडकलेल्या सर्वांना खाली सुखरूपपणे आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी आभार मानले. 

 या पर्यटकांनी चंदेरी डोंगराच्या दिशेने आगेकूच सुरू केली. मात्र रस्ता दिसत नसल्याने दुपारच्या सुमारास ते डोंगरावर अडकले. दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान गाढेश्वरचे तलाठी श्रीनिवास मिस्त्री व कोतवाल पद्माकर चौधरी व गौरव दरवडा यांचा संपर्क मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष व ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेचे सदस्य विश्वास पाटील व रिटघर गावचे पोलिस पाटील दीपक पाटील, आदेश पाडेकर, गौरव दरवडा, दामोदर चौधरी यांच्याशी झाला. त्याअगोदर मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी व उपसरपंच जनार्दन निर्गुडा यांच्यासोबत काही ग्रामस्थ डोंगरावर अडकलेल्या पर्यटकस्थळी पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळेत पोलिसही तेथे पोहोचले. पोलिस हवालदार राजकुमार सोनकांबळे, मनोहर इंगळे व तलाठी श्रीनिवास मिस्त्री हेही तेथे पोहोचले. पर्यटकांशी संपर्क साधून त्यांना धीर देण्यात आला. पर्यटकांच्या सुटकेसाठी परशुराम घुटे, अशोक हिंदोला, बुधाजी वाघ यांनीही प्रयत्न केले.

Web Title: Rescue of four tourists stuck on 'Chanderi', went for trekking and forgot the road itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड