आदई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:44 PM2024-06-20T15:44:59+5:302024-06-20T15:45:38+5:30
आदई डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेल्या चौघांना खांदेश्वर पोलीस आणि नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे खाली आणले
मयुर तांबडे
नवीन पनवेल : आदई डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेल्या चौघांना खांदेश्वर पोलीस आणि नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे खाली आणले. २० जून रोजी ते डोंगरावर गेले असताना अडकले होते.
पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना नदी, नाले, धबधबे खुणावू लागले आहेत. आदई धबधबा देखील दरवर्षी पावसाळ्यात बहरतो. निसर्गरम्य परिसरात जाण्याचा मोह अनेकांना होतो. २० जून रोजी भाईंदर येथील चार जण आदई डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ते डोंगर परिसरात अडकले. त्यांना खाली येता येत नव्हते. याची माहिती त्यांनी खांदेश्वर पोलिसांना दिली. त्यानुसार खांदेश्वर पोलीस त्या ठिकाणी गेले. बीट मार्शल आणि अग्निशामक दल यांच्या मदतीने रेस्क्यू करून या मुलांना सुरक्षित रित्या खाली आणले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. साक्षी चेतन दर्जी, युक्ती धर्मेंद्र पटेल, हेमंत केतन शर्मा, लय प्रशांत गोपर (सर्व रा. भाईंदर) अशी चौघांची नावे आहेत.
यावेळी कोन इंडियाबुल्स येथील देखील काही तरुण डोंगर परिसरात गेले होते. त्यांना देखील खाली आणण्यात आले. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश ओंबासे यांच्यासह अग्निशामक दलाचे प्रशांत कुंडलिक दरेकर - अग्निशमन प्रणेता, वैभव खंडागळे अग्निशमन प्रणेता, नवनाथ आंधळे यंत्र चालक, संतोष पड्याळ अग्निशामक, भूषण पाटील अग्निशामक, योगेश शिंदे अग्निशामक, दिग्विजय धुमाळ अग्निशामक उपस्थित होते.