‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:38 AM2024-07-27T06:38:11+5:302024-07-27T06:38:26+5:30

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता.

Rescue of 'those' 14 sailors; Overnight on board; The Coast Guard conducted a search operation | ‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी जयगड पोर्टकडे जाणारे जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबविण्यात आले होते. २४ तासांहून अधिक काळ खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या १४ खलाशांची अखेर शुक्रवारी सुटका करण्यात आली. या खलाशांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सुखरूप किनाऱ्यावर आणले.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता. दरम्यान, यावेळी अलिबागमधील धरमतर येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेले जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज खवळलेल्या समुद्रात भरकटले. कुलाबा किल्ल्याजवळ  जहाजचालकाने प्रसंगावधान दाखवून, नांगर टाकून जहाज थांबविले. जहाज भर समुद्रात अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच १४ जणांच्या सुटकेसाठी कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. मात्र, काळोख आणि धो-धो पावसामुळे मदतकार्यात बाधा आली. त्यामुळे १४ खलाशांनी संपूर्ण रात्र ही जहाजात काढली. 

कोस्ट गार्डने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्च ऑपरेशन सुरू करून जहाज गाठले. हेलिकॉप्टरमधून प्रथम कोस्ट गार्डचे पथक जहाजावर उतरले. त्यांनी सात फेऱ्यांद्वारे कॅप्टन कालियामूर्ती पेरुमल (मास्टर), ठाकूर विजय सिंह (चीफ ऑफिसर), गौरव चौधरी (सेकंड ऑफिसर), अँटोनी कोल्लमपरंबिल अंतप्पान (चीफ इंजिनिअर), अलरी राज ज्ञान अर्पुथा राज (सेकंड इंजिनिअर), तनुषकुमार चिथिराय पंडी (थर्ड इंजिनिअर), अंबाडी माधव, विलिस्टन डेनिस, प्रभात कुमार, विराज विश्वनाथ मेहेर, पीयूष लेंका, अभिषेक सिंह, अभय यादव, निलाद्री अधिकारी यांना सुखरूप समुद्रकिनारी आणले. या सर्च ऑपरेशनवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

जहाज समुद्रात भरकटल्यानंतर 
१४ खलाशांच्या सुटकेसाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सोसाट्याचा वारा, पावसाचा मारा सहन करत खलाशांचे बचावकार्य केले.

Web Title: Rescue of 'those' 14 sailors; Overnight on board; The Coast Guard conducted a search operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड