इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्य सुरु; एनडीआरएफची दुसरी टीम रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:19 AM2023-07-21T09:19:58+5:302023-07-21T09:29:17+5:30
वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला.
दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले.
घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर काल संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर आज सकाळी ६.३० वाजता पु्न्हा बचावकार्य सुरु करण्यात आले.
पायथ्याशी नियंत्रण कक्ष
घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
इर्शाळवाडीतील लोक स्थलांतरीत होणार होते, पण...
कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव ही सगळीच धोकादायक स्थिती असल्याने ग्रामस्थांना तिथून स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करूया. आमच्याच गावात शंभर एकर परिसर आहे. तिथे इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु त्याआधीच असे काही विपरीत घडेल याची कल्पना तिथल्या कुणाही ग्रामस्थांना नव्हती अशी माहिती सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली.