गेल्या २४ तासांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रायगडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २५० लोकांची वस्ती असून त्यातील १०० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आतापर्यंत ८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्कूय टीमला यश आलं आहे. हवाई मार्गानं बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सदर घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतली आहे. महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं केलं आहे. एनडीआरएफच्या ४ टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य असल्याचं ट्विट अमित शाह यांनी केली आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात माती खाली आल्यानं ती बाजूला करण्यात अडचणी येत आहेत. मोठ्या मशिनरी या ठिकाणी आणता येत नसल्याने जवानांच्या साह्याने मलबा बाजूला करण्यास विलंब लागत आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री नेमकं काय घडलं?
रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.