प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : योजनेचा लाभच मिळत नसल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:34 AM2019-06-25T01:34:31+5:302019-06-25T01:35:00+5:30
शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
दासगाव - शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना उत्तरे देत नसल्याने अखेर शेतक-यांनी हे निवेदन दिले आहे. याबाबत तहसीलदारांनी गंभीर दखल घेत योग्य कार्यवाही करण्याचे गट विकास अधिकारी यांना सूचित केले आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार साधारण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या योजनेतील लाभार्थी शेतक-यांनी आपले अर्ज संबंधित शासकीय कर्मचाºयांकडे सुपूर्द केले. त्यातील काहींना या योजनेचा लाभ देखील प्राप्त झाला. मात्र महाड तालुक्यातील आडी गवळवाडी येथील शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. या ग्रामपंचायतीमधील जवळपास ३२ शेतक-यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज दखल केले होते. मात्र यातील केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकºयांनी पुन्हा अर्ज करण्यासाठी प्रयत्न केले. अर्ज दाखल करण्याची तारीख २५ जून असून अर्ज आपल्याकडे नाहीत अशी उत्तरे तलाठी आणि ग्रामसेवकांकडून मिळत आहे. अर्ज या विहित वेळेत न मिळाल्यास अन्याय होण्याची भीती या शेतक-यांना आहे.
याबाबत उर्वरित शेतक-यांनी ग्रामसेवक तायडे यांना विचारले असता त्यांनी तलाठ्यांकडे बोट दाखवले. मात्र हे काम ग्रामसेवकाकडे असल्याने आपला यात संबंध नाही असे उत्तर तलाठी पानसरे यांनी शेतकºयांना दिले. यामुळे या शेतकºयांनी थेट महाड सभापती दत्ताराम फळसकर यांची भेट घेतली. मात्र ग्रामसेवक तायडे याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत.अखेर या ३२ शेतकºयांनी आपले निवेदन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना दिले.
आडी गवळवाडी येथील शेतकºयांनी महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. तहसीलदार पवार यांनी तत्काळ महाड गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही व्हावी असे सूचित केले. पवार यांच्या या भूमिकेनंतर आडी गवळवाडी शेतकºयांनी गट विकास अधिकारी गोडांबे यांना देखील निवेदन दिले. यावेळी सरपंच विशाल चव्हाण, नथुराम कदम उपसरपंच, संतोष कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनंदा खेडेकर, संतोष नटे, अंकिता महाडिक, सुषमा काते, ज्योती काते, आशा कांबळे, पार्वती मुरुडकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आमच्या गावातील जवळपास ३२ शेतक-यांपैकी केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देत नाही. शिवाय तलाठी देखील हे काम आपले नसल्याचे ग्रामस्थ विजय खेडेकर यांनी सांगितले.