‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 05:21 AM2020-09-27T05:21:41+5:302020-09-27T05:21:50+5:30
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली.
श्रीवर्धन : महाराष्ट्रातील विद्यमान सरकार पूर्ण क्षमतेने आरक्षणासंदर्भात ठोस पावले उचलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार दिल्लीमध्ये मी स्वत: तसेच महाराष्ट्रात निवडून गेलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेस आयचे खासदार पूर्ण शक्तिनिशी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. या आरक्षणाच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मराठा समाजाच्या विविध समस्या व मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने तटकरे यांना दिले. तटकरे म्हणाले, यापूर्वी राज्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण देताना, केंद्राच्या संमतीने दिले असते, तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. मात्र, भाजप सरकारने राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक ठोस भूमिका घेतली नाही. तामिळनाडू राज्यामध्ये देण्यात आलेले आरक्षण तेथील राज्य सरकारने वेळीच केंद्राकडून परवानगी घेऊन आरक्षणाचा टक्का वाढविण्यात त्यांचे राज्य सरकार यशस्वी झाले.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती अन्यायकारक आहे. मी स्वत: मराठा समाजाच्या मागण्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर करून याविषयी त्यांच्याशी चर्चा करेन.
राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.