- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे डोळे लावून बसलेल्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद शेकापकडे जाणार असले, तरी पक्षातील अनुसूचित जमातीच्या महिलेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. त्यामुळे प्रस्थापित घराण्यांचे थेट वर्चस्व आता राहणार नसल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.शेकापकडे योगिता पारधी (पनवेल) आणि पदीबाई ठाकरे (पनवेल) असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. तर काँग्रेसच्या अनसूया पादीर (कर्जत) आणि शिवसेनेच्या सहारा कोळंबे (कर्जत), असे एकूण चार सदस्य अनुसूचित जमातीचे आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या वेळेला अध्यक्षपदी पेण तालुक्यातील सदस्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते होते. आरक्षण खुला प्रवर्ग अथवा ओबीसी प्रवर्गासाठी पडल्यास नीलिमा पाटील, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास शेकापचे महादेव दिवेकर आणि दिलीप भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती; परंतु आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी पडले आहे, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.शेकापकडे योगिता पारधी आणि पदीबाई ठाकरे, असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. दोन्ही सदस्य हे पनवेल तालुक्यातील आहेत. पेण तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याची तयारी शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. मात्र, आता गणित बिघडले आहे.अलिबाग, पेण आणि पनवेल या ठिकाणी शेकापचे प्रतिनिधित्व करणारे सक्षम नेते आहेत. अलिबाग हे शेकाप चिटणीस आमदार जयंत पाटील, पेणमध्ये माजी आमदार धैर्यशील पाटील आणि पनवेलमध्ये माजी आमदार विवेक पाटील आणि आमदार बाळाराम पाटील असा पक्षाला चेहरा आहे. तिन्ही ठिकाणी त्यांच्या आधीच्या पिढीने पक्षासाठी मोलाचे योगदान दिले आहे. पक्षाच्या कठीण प्रसंगामध्ये नेहमीच या तिन्ही विभागातील प्रमुखांनी पक्षाला एक संघ ठेवून पक्षवाढीसाठी योगदान दिले आहे. सध्या शेकापची सर्वस्वी धुरा ही अलिबागच्या पाटील घराण्याच्या खांद्यावर आहे.अध्यक्षपदावर पनवेलचे वर्चस्व राहण्याचा मार्ग सुकर दिसत असला, तरी उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील आहेत. हेही विसरून चालणार नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पनवेलचे शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेचे हंगामी अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर आमदार बाळाराम पाटील हे बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.अडीच वर्षांपूर्वी शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद दिले होते. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षे शेकापचा अध्यक्ष विराजमान होणार, असा अलिखित ठराव आहे. मात्र, आरक्षण हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी पडले आहे.शेकापकडे योगिता पारधी आणि पदी ठाकरे असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. त्यामुळे पनवेलकडे अध्यक्षपद जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण हे आता पनवेलवरून हलवले जाणार आहे.पनवेलच्या वर्चस्वाखाली जिल्हा परिषदेचा कारभार हाकला जाणार असल्याने तो अलिबागच्या नेतृत्वाच्या किती पचनी पडणार हे लवकरच समोर येणार आहे.रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. शेकापकडे असणाऱ्या सदस्यांचा विचार होणार आहे. मात्र, अद्याप याबाबतची बैठक झालेली नाही. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे कामानिमित्त व्यस्त आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, सर्वानुमतेच निर्णय घेतला जाईल.- बाळाराम पाटील, आमदाररायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे पनवेलमधील शेकापचे नेते ठरवतील कोणाला अध्यक्ष बनवायचे ते. याबाबत लवकरच निर्णय होईल.- आस्वाद पाटील, हंगामी अध्यक्ष
आरक्षणामुळे घराणेशाहीला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:14 AM