कंटेनरमध्ये राहणाऱ्यांना मार्चअखेर घराचा ताबा, तळिये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 09:37 AM2023-02-04T09:37:53+5:302023-02-04T09:38:31+5:30
Home News: दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे.
महाड : दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे. ३२ घरांचे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. सध्या कंटेनरमध्ये राहत असलेल्या २५ कुटुंबीयांना मार्चअखेर नवीन घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असेल तर २०० घरांचे बांधकाम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन यांनी दिले आहे.
तालुक्यातील तळिये गावावर २२ व २३ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून ६६ घरे गाडली गेली होती. त्यात ८७ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त तळिये गावाच्या पुनर्वसनात घरे बांधून देण्याचे काम म्हाडाने अर्थातच कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने घेतले आहे, तर पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषदेकडे आहे.
तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत १७.६४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जागेमध्ये २३१ घरकुल बनवण्याचे काम ऑगस्ट २०२१ पासून म्हाडाने हाती घेतले. यासाठी ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कामाची कार्यादेश देण्यात आला आहे. उर्वरित ३० घरकुलांसाठी शासनामार्फत जागेचा शोध सुरू असून जागा संपादित केल्यानंतर ही घरकुलेही म्हाडामार्फत बांधली जाणार आहेत.
तळिये येथे म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, सहायक अभियंता राज अर्नालिका, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील यांनी दौरा केला.
- नव्याने बांधण्यात येणारे घरकुल हे ६०० चौरस फुटांचे असून यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल, किचन, संडास बाथरूम व चारही बाजूंनी ४ फूट पडवी, असे स्वरूप असणार आहे.
- एका घरकुलांसाठी २० लाखांचे बजेट असून संपूर्ण प्रोजेक्टसाठी ७७ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. आयआयटी पवईकडून घरकुलाचे स्ट्रक्चर व त्यांचे मजबुतीकरण प्रमाणित करण्यात आले आहे.
- ग्रामीण भागातील जनतेला मॉडर्न लाइफ देण्याचा प्रयत्न या घरकुलातून करण्यात आला आहे. घरकुलाच्या मेंटेनन्सची ५ वर्षे जबाबदारी संबंधित ठेकेदाराने घ्यायची आहे. कमीत कमी ५० वर्षे टिकेल असे हे वॉटर व फायर प्रूफ बांधकाम आहे, असे जैन यांनी सांगितले.