रिलायन्स गॅस पाइप लाइनला विरोध
By admin | Published: September 29, 2015 01:20 AM2015-09-29T01:20:35+5:302015-09-29T01:20:35+5:30
तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे
कर्जत : तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे, तशा प्रकारच्या नोटिसा भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना आल्या आहेत. मात्र काही झाले तरी आम्ही आमच्या शेतजमिनीतून पाइप लाइन टाकू देणार नाही असा ठाम निर्धार कर्जतमधील शेतकऱ्यांनी बैठकीत केला आहे.
भारत सरकारने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने इथेन वाहतूक करण्यासाठी दहेज ते नागोठणेपर्यंत रिलायन्स गॅस पाइप लाइन्स लिमिटेड कंपनीला पाइप लाइन टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. ही पाइप लाइन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जात आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीखालून पाइप लाइन घालण्यासाठी जमिनीच्या वापराबाबतचे हक्क संपादन करण्याच्या नोटीस सूर्या प्रकल्प डहाणू तथा सक्षम प्राधिकारी रिलायन्स गॅस पाइप लाइन्स लिमिटेडचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसला शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात हरकती घेतल्या आहेत, मात्र या संबंधीची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली आहे.
ही रिलायन्स गॅस पाइप लाइन आम्ही आमच्या शेतजमिनीमधून टाकू देणार नाही यासाठी बाधित
शेतकऱ्यांची बैठक दहिवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी झाली. या बैठकीस आमदार सुरेश लाड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई विलास थोरवे, माजी सरपंच बाळू थोरवे, निमंत्रक अविनाश कडू, विलास देशमुख आदी उपस्थित होते.(वार्ताहर)