उरण : सर्वच सणासुदीत आणि गणेशोत्सव काळात घरदार सोडून जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना एखाद्या दिवशी तरी गणपतीची आरती करण्याचा मान द्यावा अशी विनंती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केली आहे.
समाजासाठी, जनतेच्या रक्षणासाठी पोलिस अहोरात्र झटत असतात.सणासुदीच्या काळात तर त्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात.जनतेला सण, उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही सणासुदीचा आनंद उपभोगता येत नाही. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही.घरात गणपती असला तरी कर्तव्य व कामाचा भाग म्हणून सतत घराबाहेर राहावे लागते. घरातील गणपतीची साधी आरतीही त्यांना करता येत नाही. आपल्या कुटुंबियांनाही त्यांना वेळ देता येत नाही.
पोलीस अधिकारी, कर्मचारीही माणसंच आहेत. त्यांनाही सुख दुःख आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करण्याची गरज आहे.गणेश मंडळ उत्सवाची आरती २१ दिवस दोन वेळा म्हणजे २२ वेळा होते. गणशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातील आरतीला हजर राहता येत नाही. त्यातील किमान एका आरतीचा मान हा आपल्या मंडळाच्या समोर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. त्यांना आरतीचा मान देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला या उत्सवात सहभागी करून घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल. त्यांचा अशा प्रकारे गणेश मंडळाने सन्मान केल्यासारखे होईल अशी विनंती वजा-आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अशी विनंती पत्र देण्यात आली आहेत.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका, शहरातील शाखांमार्फत ही विनंती पत्र देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले तसेच उरण तालुकाध्यक्ष वैभव पवार यांनी दिली.