जबाबदार अधिकारीच अपत्तीच्या प्रसंगी जिल्ह्याबाहेर असल्याचे उघड
By Admin | Published: June 29, 2017 02:56 AM2017-06-29T02:56:31+5:302017-06-29T02:56:31+5:30
संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जाऊ नये, तसेच अशा परिस्थितीत जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून बाहेर गेले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर आपत्ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत दिलेले होते. असे असतानाही, हे आदेश झुगारून जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जात असल्याचे सोमवारी अलिबाग-रोहा राज्यमार्गावरील सहाण गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी निष्पन्न झाले.
सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अलिबाग रोहा राज्यमार्गावरील सहाण या गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला असून, येथे वाहतुकीस धोका असल्याचे येथे त्याच वेळी अलिबागला येताना पोहोचलेले शेतकरी महेश्वर देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ही माहिती दिली. ‘लोकमत’ कार्यालयातून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना कळवल्यावर ते आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सरकारी व्यवस्थेतील पोहोचलेले ते पहिले अधिकारी होते. अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ हे दुसरे तर अलिबाग एसटी आगारप्रमुख तेजस गायकवाड हे तिसरे तत्काळ पोहोचणारे सरकारी अधिकारी होते.
रायगड जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सदस्य असणारे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे घटनास्थळी अनेकदा संपर्क करूनही पोहोचले नाहीत. त्यांच्या विभागाचे अन्य अभियंतादेखील कुणी घटनास्थळी फिरकले नाहीत. या संदर्भात पाटील यांना त्यांच्या कार्यालयात बुधवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले तर पाटील यांच्या मोबाइलवर अनेकदा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे २४ ते २६ जून अशी शासकीय सुट्टी असल्यामुळे नाशिक येथे गेले होते, त्यामुळे २६ जून रोजी निर्माण झालेल्या सहाण येथील आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ते पोहोचू शकले नाहीत.
सहाण येथील पुलाचा रस्ता खचल्यावर धोकादायक परिस्थितीच्या वेळी सहाण गावातील तरुणांनी रस्त्यावर येऊन तत्काळ वाहतूक नियंत्रण केले, तर अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी रस्त्यावरील धोकादायक भागावर बॅरिकेट्स लावून आवश्यक ती उपाययोजना केली. दरम्यान, या पुलावरून अलिबाग, मुरुड आणि रोहा एसटी आगाराच्या दररोज सुमारे २५ ते ३० बसेसच्या फेऱ्या होत असतात. धोकादायक झालेल्या पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे, एसटी बसवाहतूक बंद करावी का सुरू ठेवावी, याबाबत खातरजमा करण्याकरिता मी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्याची माहिती अलिबाग एसटी आगाराचे आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.