श्रीवर्धन/अलिबाग : एसटी कर्मचारी संघटनेने केलेला संप न्यायलयाने बेकायदा ठरवल्यावर अखेर तो मागे घ्यावा लागला आहे. परिणामी, शनिवारी रायगड जिल्ह्यातील आठही एसटी आगारांतून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. एसटी सुरू झाल्याने त्याच बरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. शनिवारी भाऊबीजेच्या निमित्ताने एसटी प्रवास करता आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्यातील आठ एसटी आगारांचे एकूण दैनंदिन आर्थिक उत्पन्न ५० लाख रुपये आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने होणा-या वाढीव प्रवासी वाहतुकीमुळे त्यामध्ये वाढच होत असते; परंतु ऐन दिवाळी सणाच्या काळात झालेल्या संपाच्या तीन दिवसांच्या काळात रायगड एसटी विभागाचे सुमारे दीड कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त रद्द झालेल्या एसटी बसेसचा आरक्षण परतावा प्रवासांना द्यावा लागणार असल्याने नुकसानीत वाढ होणार आहे.चार दिवस सुरू असलेल्या या संपामुळे श्रीवर्धन आगारात अंदाजे २० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. श्रीवर्धन आगारात कार्यरत असलेल्या ३३१ कामगारांपैकी ५ प्रशासकीय कर्मचारीच संपादरम्यान कामावर होते. श्रीवर्धन आगारातून मुंबई-बोरीवली व ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाल्याने खासगी वाहतूकदारांनी दर अवाच्या सव्वा वाढवले होते. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागला. शहरी भागातील लोकांना अतिरिक्त शुल्क आकारून इच्छित स्थळ गाठता आले. मात्र, ग्रामीण भागात लोकांचे दळणवळण पूर्णत: ठप्प झाले होते. शेवटी मिळेल त्या वाहनाचा वापर करत लोकांनी तालुक्याचे ठिकाण गाठले.श्रीवर्धन, म्हसळा या दोन्ही तालुक्यांतील बहुतांश जनता वाहतुकीसाठी एसटी वरती अवलंबून आहे. संपामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले.>नागोठणेतील बससेवा रविवारपर्यंत सुरळीत होणारनागोठणे : मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आदेशानुसार एसटी कामगार संघटनांनी शनिवारी मध्यरात्री बंद मागे घेतल्याने काही अंशी एसटी वाहतूक चालू झाली आहे. नागोठणे स्थानकात शनिवारी सकाळी ७.४५ वाजता रोहे-पुणे ही पहिली गाडी आल्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत नियमित असणा-या ८९ पैकी ५२ एसटी बस स्थानकात आल्या होत्या. दिवसभरात स्थानकात साधारणत: ३५० गाड्या येत असतात. शनिवारी वस्तीच्या गाड्या संबंधित ठिकाणी गेल्यानंतर रविवारपासून एसटीची सेवा सुरळीत होईल, असे येथील वाहतूक नियंत्रक यू. एस. गायकर यांनी स्पष्ट केले. दुपारी १पर्यंत नागोठणे स्थानकातून पुणे, मुंबई, महाड, अलिबाग, रोहे, पेण, जांबोशी, पालीकडे गाड्या मार्गस्थ झाल्या.विशेष सुविधा म्हणून माणगाव आणि रोहे स्थानकांतून पनवेलसाठी १० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या व त्याचा फायदा नागोठणेतून पेण-पनवेल मार्गाकडे जाणाºया प्रवाशांना झाल्याचे गायकर यांनी सांगितले.>ग्रामीण भागात प्रवासी सुखावलेरेवदंडा : सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी हक्काचे वाटणारे साधन म्हणजे परिवहन मंडळाची बससेवा; पण तिचा ऐन दीपोत्सव सणाच्या सुरुवातीला संप झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना येण्याचा जाण्याचा परवडणारा मार्ग बंद झाला होता.दीपावली खरेदीसाठी अनेक जण बाजारात दाखल झाले नाहीत, पर्यायाने बाजारपेठेत गर्दी कमी दिसली. व्यवसायावर परिणाम दिसला. मध्यरात्री संप मिटल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुखावले आहेत. आजच अनेकांनी भाऊबीजला जाण्यासाठी एसटीचा आधार घेतला.गेले चार दिवस शुकशुकाट पसरलेल्या बसस्थानकात प्रवाशांची रेलचेल जाणवत होती. दरम्यान, या संपामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल होऊ शकली नाहीत.एसटी संपाचा फटका फुले व्यावसायिकांना बसला, त्यामुळे लक्ष्मीपूजनापासून फुलांचे दर वधारलेले आहेत. संप मिटल्याने आरक्षण केंद्रावर बसच्या आरक्षण चौकशीसाठी प्रवासी दिसू लागले आहेत.शनिवारी भाऊबीजचा सण असल्याने सकाळी बाजारपेठेत कापड दुकानदार, भांड्यांची दुकाने यांच्याकडे गर्दी जाणवत होती, तसेच हलवाई दुकानात खरेदीला गर्दी होती.>पनवेल आगारातून १०० टक्के वाहतूक सुरूपनवेल : एस.टी.महामंडळाच्या कर्मचाºयांनी शुक्र वारी रात्री संप मागे गेतल्याचे जाहीर केल्यावर पनवेल आगारातील चालक - वाहक कामावर हजर झाले. शनिवारी पहाटे ३ पासून आगारातून वाहतूक सुरू झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत १०० टक्के वाहतूक सुरू झाल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी एस.टी कामगार १७ आॅक्टोबरपासून संपावर गेले होते. शुक्र वारी मुंबई उच्च न्यायालयाने कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवून कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. कामगार संघटनेच्या नेत्यांनी रात्री उशिरा कामगारांना हजर होण्यास सांगितले. त्याप्रमाणे पनवेल आगारातील संपावर असलेले कामगार पहाटे पासून कामावर आले.पनवेल आगारातून पहिली सुटणारी पहाटे ३.00 वाजताची पनवेल-डोंबिवली गाडी पहिली सुटली. त्यानंतरच्या सर्व गाड्या वेळे प्रमाणे रवाना झाल्याची माहिती ए.टी.एस. शिरसाट यांनी दिली. भाऊबीजेच्या दिवशी एस.टी. कामगारांचा संप मिटल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.पनवेल आगारात शुक्र वारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुपारी संपावरील कामगारांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. या वेळी त्यांनी कामगारांना तुमच्या मागण्या रास्त आहेत. त्याला माझा पाठिंबा राहील, संपाला नाही असे सांगून ग्रामीण भागात एसटी अनिर्वाय आहे. त्यामुळे प्रवाशांना व कामगारांना होणाºया त्रासाची काळजी शासनाने घेतली पाहिजे, असे संगितले.
जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्ववत, संपकाळात सुमारे दीड कोटींचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:57 AM