ग्रामदैवत श्री बापूजी महाराज मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:03 PM2019-06-01T23:03:19+5:302019-06-01T23:03:32+5:30
नांदवीमध्ये तीन दिवस धार्मिक कार्यक्रम : पंचकोशीतील हजारो भाविकांची हजेरी
अलिबाग : माणगाव तालुक्यातील नांदवी गावचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, नवीन मंदिराचे उद्घाटन व मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्र म मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरावर कलशारोहण करण्यात आले.
धार्मिक विधींबरोबरच भजन, कीर्तन, होमहवन असे विविध धार्मिक कार्यक्र म तीन दिवस आयोजित केले होते. पहिल्या दिवशी मंदिरापासून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांच्या आतशबाजीत निघालेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. रात्री सुश्राव्य कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी दिवसभर अग्नीस्थापना, वास्तुप्रासाद हवन, लोकपाल प्रतिलोकपाल हवन, मूर्तीचे दशविध स्नान, दीपवास, धूपवास, पुण्यवास व धान्यवास असे धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमासाठी मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी द्वारपूजन, घंटापूजन व मुख्यहवन झाल्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कलशारोहण झाले. नांदवी गांवचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही बापूजी महाराजांचे दर्शन घेतले.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान
नांदवीचे ग्रामदैवत असलेले श्री बापूजी महाराज म्हणजे पंचक्रोशी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवस्थानची यात्रा भरते. परिसरातील हजारो भाविक यात्रेला हजेरी लावतात. मुंबईकर चाकरमानी आवर्जून उत्सवाला हजर असतात. यात्रेच्या निमित्ताने गावागावांतील देवदेवतांच्या पालख्या, काठ्या बापूजी महाराजांच्या भेटीसाठी येतात. बापूजी महाराजांच्या जुन्या मंदिराची दुरवस्था झाली होती, त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला.