मुरुड तालुक्यातील वीजपुरवठा लवकर सुरळीत करा; शिष्टमंडळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:03 AM2020-06-18T01:03:12+5:302020-06-18T01:03:28+5:30
तहसीलदारांकडे मांडली कैफियत
मुरुड : तालुक्यात आज १३ दिवसांपासून वीज गायब आहे. हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याची कोणतीच शाश्वती नाही. वीज मंडळाकडून वीज येणार, असे फक्त सांगितले जात आहे. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानासुद्धा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन केले जात नाही, मग जनतेने न्याय कोणाकडे मागावा अशी कैफियत मुरुड तहसीलदारांकडे मांडण्यात आली. तालुक्यात लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित जैन ढग्या शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तहसीलदारांची भेट घेण्यात आली. या वेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी माजी तहसीलदार नयन कर्णिक, विहूरचे माजी सरपंच मुश्रत उलडे आदींसह अनेक मान्यवरांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तहसीलदार गमन गावीत हे एका कार्यक्रमाला गेल्यामुळे शिष्टमंडळाने महसूल नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांची भेट घेतली.
यावेळी जैन यांनी लोकांच्या भावना काय आहेत हे सांगितले, तसेच मुरुड वीजमंडळ ७०० पेक्षा जास्त खांब पडल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ७५ खांब बसवून झाले आहेत. पडलेले खांब जास्त असताना मनुष्यबळ कमी असल्याने हे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. तालुका दंडाधिकारी यांना विशेष अधिकार असून, लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी उप कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासोबत सभा आयोजित करावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी के ली. यावेळी नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांनी आपल्या समस्यांचे लवकरात लवकर निरसन होण्यासाठी तहसीलदारांना सांगून लवकरच सभा आयोजित करण्यात येईल, असे अश्वासित केले.