जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:20 PM2021-01-10T23:20:59+5:302021-01-10T23:21:36+5:30
मुरुडमधील बोट मालक-चालकांच्या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवसाला हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. अशा वेळी ४०० पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना मान्य नसल्याने बोट मालक-चालक यांनी ३ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे पर्यटकांना किल्ला न बघता परतावे लागत होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटवून किल्ला सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. विशेषतः शनिवार-रविवार पर्यटकांची मोठी संख्या असते. मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी बोट मालक-चालकांच्या आंदोलनाच्या पाठिंब्याकरिता राजपुरी किल्ला जेटीवर जाऊन आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून किल्ल्यावरील निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी किल्ल्यावरील निर्बंध हटवून किल्ला सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जंजिरा पर्यटक सहकारी जल वाहतूक सोसायटीचे व्यवस्थापक नाझ कादरी यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुरुड तहसीलदार गमन गावित यांचे यावेळी आभार मानले.
राजपुरी जेटी येथे येऊन बोट मालक-चालकांना किल्ला सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी सुरू करा. त्याबरोबर कोविड १९च्या नियमांची अंमलबजावणी करावी. सोशल डिस्टन्सचा वापर व मास्कचा वापर करावा. त्यानुसार रविवारपासून किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे.
- गमन गावित,
तहसीलदार, मुरुड