अलिबाग - सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि.6 जून 2024 पर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दि.16 मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी / उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी मिरवणूक, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करणे तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे ई. तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे.