टाळेबंदी केलेली मर्क्स कंपनी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:05 PM2018-10-14T23:05:09+5:302018-10-14T23:06:15+5:30
उरण : बडतर्फ कामगारांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कारवायांमुळे टाळेबंदी केलेली मर्क्स (एपीएम) सीएफएस कंपनी रविवार संध्याकाळपासून सुरू करण्यात आली ...
उरण : बडतर्फ कामगारांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कारवायांमुळे टाळेबंदी केलेली मर्क्स (एपीएम) सीएफएस कंपनी रविवार संध्याकाळपासून सुरू करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय संघर्ष समिती, पोलीस प्रशासन आणि कामगारांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर रविवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कंपनीचे गेट एपीएम टर्मिनलचे एमडी अजित व व्यंंकटरमण यांनी उघडताच कंपनीच्या कामगारांनी जल्लोष केला. कंपनीच्या या सकारात्मक निर्णयामुळे ४५० कामगारांचा रोजगार वाचला आहे. मात्र, कंपनी प्रशासनाने बडतर्फ केलेल्या ९९ कामगारांना परत कामावर घेण्यास नकार दिला आहे.
उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदराजवळच्या द्रोणागिरी नोडमधील मर्क्स (एपीएम) गोदामाला शुक्र वार, २८ सप्टेंबरपासून टाळे लागले होते. एपीएम कंपनीने व्यवसाय कमी होत असल्याचे कारण देत, या गोदामातील ९९ कामगारांना जानेवारी महिन्यात कामावरून कमी केले होते. या कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. कामगारांच्या हिंसक कारवायांमुळे कंपनीने या ९९ कामगारांना कामावर परत घेण्याचे तर सोडून द्या; पण उलट द्रोणागिरीतील हे मर्क्स (एपीएम) सीएफएसच बंद करून टाळेबंदी लागू केली होती. कंपनीने केलेली टाळेबंदी मागे घ्यावी, यासाठी मध्यस्तीचा तोडगा काढण्यासाठी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, स्थानिक पुढारी यांनी कंपनी प्रशासनाबरोबर सतत चर्चा केली.
अखेर एपीएम प्रशासनाला सुरक्षेची हमी मिळाल्यानंतर हे गोदाम आज रविवारपासून सुरू करण्यात आले. कंपनीचे गेट खोलल्यानंतर कामगारांनी एकच जल्लोष करून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.