पेण तालुक्याचा निकाल ८७.५७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:19 AM2019-05-29T00:19:17+5:302019-05-29T00:19:20+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल ऑनलाइन निकाल जाहीर झाला
पेण : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून पेण तालुक्याचा निकाल ८७.५७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या मानाने या वर्षीचा निकाल कमी लागला असून एकूण १८०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी १८०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिला. १५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूलने बाजी मारुन सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. या प्रशालेचा कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांचा एकत्रित निकाल ९२.६६ टक्के लागला आहे.
दुपारपासून आॅनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक वर्गाने सायबर कॅफेमध्ये एकच गर्दी केली होती. यावेळी मोबाइल हॅण्डसेटवर सुद्धा ग्रुप करून विद्यार्थीवर्ग आॅनलाइन निकाल पाहण्यात दंग झालेला होता. यंदाच्या निकालामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान, वाणिज्य, कला तिन्ही शाखांच्या एकत्रित निकालाची सरासरी ९२.६२ टक्के इतकी आहे.
सार्वजनिक विद्यामंदिर पेणच्या ज्युनिअर कॉलेजचा निकालामध्ये तिन्ही शाखेचा सरासरी निकाल ८८.३६ टक्के आहे. न्यू इंग्लिश स्कूल जोहे प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान, कला दोन्ही शाखांचा एकत्रित निकाल सरासरी ८८.९२ टक्के इतका आहे. जयकिसान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वडखळ कला शाखेचा निकाल ६३.३८ टक्के इतकी आहे. सुधागड एज्युकेशन दादर ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा निकाल ८६ टक्के लागला. वरसरी आश्रम प्रशालेचा कला शाखेचा निकाल ८६.८४ टक्के आहे. एम.सी.व्ही.सी. प्रशालेचा ८१.६३ टक्के निकाल लागला. एम.सी.व्ही.सी. ज्युनिअर कॉलेजचा ६७.०८ टक्के निकाल लागला.