परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:57 AM2018-05-12T01:57:11+5:302018-05-12T01:57:11+5:30
१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात पाळला जातो. १८५४ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत त्यांची शुश्रूषा करीत हिंडणारी आद्य परिचारिका
जयंत धुळप
अलिबाग : १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात पाळला जातो. १८५४ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत त्यांची शुश्रूषा करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका मानले जाते. त्यांनी परिचारिका आणि रुग्णसेवा या नात्याची निर्मिती आपल्या कृतीतून केली आहे. परंतु आरोग्य विभागाच्या निर्णयांमुळे सरकारी आरोग्य सेवेतील परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे परिचारिका आणि रुग्णसेवा नात्यातच खंड पडत असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग शहरातील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात परिचारिकांची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५७ पदे भरली असून ३८ परिचारिकांची पदे रिक्त आहेत. परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे रुग्ण सेवेवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्याकरिता २२ परिचारिकांची करारावर नियुक्ती करून ३८ रिक्त पदांची संख्या तात्पुरती १६ वर आणण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली आहे. दरम्यान, माणगाव, पेण, पनवेल, महाड येथे असलेल्या उप जिल्हा रुग्णालयातही देखील परिचारिकांची पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेत खंड पडत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेंतर्गत जिल्ह्यात एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८८ आरोग्य उप केंद्रे कार्यरत आहेत. या एकूण ३४० आरोग्य सेवा केंद्रांकरिता मुळातच ६२ परिचारिकांची पदे शासनाने मंजूर केली आहेत आणि त्यापैकी ५९ भरली आहेत. तीन परिचारिकांची पदे रिक्त आहेत. परिचारिकांची पदे वाढविण्याऐवजी शासनाने ‘आरोग्य सेविका’ ही संकल्पना अमलात आणली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेविकांची ५२४ पदे शासनाने मंजूर केली आहेत. त्यापैकी ३२३ पदे भरली आहेत तर तब्बल २०१ आरोग्य सेविकांची पदे रिक्त असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.