अनोखी सेवानिवृत्ती : १९ किलोमीटर धावत जाऊन स्वीकारली निवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:14 PM2020-06-03T23:14:11+5:302020-06-03T23:15:21+5:30
सातारा : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे जनतेने आपापली काळजी घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, याची जनजागृती व्हावी, यासाठी कोरेगाव पोलीस ...
सातारा : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे जनतेने आपापली काळजी घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, याची जनजागृती व्हावी, यासाठी कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांनी सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी तब्बल १९ किलोमीटर धावत जाऊन सेवानिवृत्ती स्वीकारली. साबळे यांनी अनोख्याप्रकारे कोरोनासंदर्भात जनजागृती केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सेवानिवृत्ती म्हटलं की हार-तुरे सत्कार, भाषण असा जंगी कार्यक्रम होत असतो. मात्र, सध्या कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाच्या जागतिक महामारीचा सर्वांनाच फटका बसला आहे. अनेकजण कोरोनामुळे बळी पडत आहेत. त्यामुळे आपण आपल्या शेवटच्या दिवशी कोरोनापासून नागरिकांनी सावध राहावे, हा संदेश घराघरांत पोहोचला जावा, यासाठी वसंत साबळे यांनी साताऱ्याहून कोरेगावला धावत जाऊन निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दि. ३१ रोजी रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील निवृत्तीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर अकराच्या सुमारास ते धावत कोरेगाव पोलीस ठाण्यापर्यंत गेले. वाटेत धावताना त्यांचे अनेकांनी स्वागत केले. कोरोनापासून आपला बचाव करा, असा संदेश देत ते तब्बल १९ किलोमीटर अंतर धावले. पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यासमोर उभे राहून हात जोडले.
गेली तीस वर्षे पोलीस दलात कार्यरत असतानाच अनेक सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. लोकांना वृक्षारोपणासाठी आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले. आयुष्यात शरीरयष्टी चांगली असेल तर कोणतेही काम शक्य नसते. यासाठी आमच्या पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यायामाची आवड निर्माण केली. याचे मला आयुष्यभर समाधान राहील.
- वसंत साबळे , निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, कोरेगाव
कोरेगाव येथे पोलीस अधिकारी वसंत साबळे यांनी १९ किलोमीटर धावत जाऊन सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर पोलीस ठाण्याला हात जोडले.