कर्जतमधील जि.प.चे निवृत्त कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:51 AM2019-06-11T01:51:55+5:302019-06-11T01:52:05+5:30
४८० निवृत्त शिक्षकांचा प्रश्न : १० जून आला तरी पेन्शन नाही
नेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पदरी कर्जत पंचायत समितीचे प्रशासन दुजाभाव दाखवत आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बँकेत जमा करण्यात कर्जत पंचायत समिती प्रत्येक महिन्यात उशीर करीत असून ७०-८० वय झालेले निवृत्त कर्मचारी पेन्शन जमा झाली का? हे पाहण्यासाठी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकेत चकरा मारत आहेत. दरम्यान,१० जून आला तरी निवृत्त कर्मचाºयांचे पगार जमा झाले नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करत आहे.
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सेवा केलेले शिक्षक असून त्यात ४८० निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन दिले जाते. त्यातील काही निवृत्त शिक्षकांचे वय आज ८० वर्षांच्या पुढे आहे. तर ४८० मधील अनेक निवृत्त कर्मचाºयांना आपल्या निवृत्ती वेतनावर महिना काढावा लागतो. त्यामुळे बहुतेक निवृत्त कर्मचारी हे नवीन महिना उजाडला की रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पोहचतात आणि आपली पेन्शन जमा झाली असेल तर ती काढून महिन्याचे नियोजन करण्याची आकडेमोड करतात. त्यासाठी महत्त्वाची असलेली जबाबदारी कर्जत पंचायत समिती वेळेवर पार पडत नसल्याने निवृत्त कर्मचाºयांना जिल्हा बँकेच्या शाखेत चकरा माराव्या लागत आहेत. जिल्हा परिषदेने घालून दिलेल्या नियमानुसार निवृत्त कर्मचाºयांच्या वेतनाचा धनादेश तालुका पंचायत समितीमधून जिल्हा बँकेच्या शाखेत महिन्याच्या दुसºया किंवा तिसºया तारखेला पोहचला पाहिजे. मात्र कोणत्याही महिन्यात निवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनचा चेक बँकेत पहिल्या पाच दिवसात एकदाही जमा होत नाही अशी तक्रार दर महिन्याला रायगड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना करीत असते.
जून महिन्याची १० तारीख उजाडली तरी जिल्हा परिषदेची सेवा बजावलेल्या कर्मचाºयांना त्यांचे हक्काचे निवृत्ती वेतन मिळाले नाही. दर महिन्यात निवृत्ती वेतन महिन्याच्या किमान पहिल्या आठवड्यात मिळावे यासाठी जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष रा. का. भवारे, उपाध्यक्ष गजानन म्हात्रे आणि सचिव अरुण मोकल तसेच अन्य पदाधिकारी हे कर्जत पंचायत समिती कार्यालयात जाऊन लेखाधिकाºयांची मनधरणी करतात. मात्र लेखा विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून निवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनचा धनादेश हा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पोहचत नाहीत. कर्जत पंचायत समिती आपल्या निवृत्त कर्मचाºयांच्याबाबत दाखवत असलेल्या उदासीनतेमुळे निवृत्त कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत.