निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी मारल्या ११ हजार जोर बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 10:56 AM2024-01-26T10:56:31+5:302024-01-26T10:57:39+5:30
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले सन्मानित
अलिबाग : रायगड पोलीस दलातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ११ हजार ४०० जोर बैठका मारून नवीन विक्रम केला आहे. विश्वनाथ पाटील यांचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने त्यांना प्रोत्साहन दिले.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड मैदान अलिबाग येथे विश्वनाथ पाटील पहाटे यांनी पहाटे 4.00 वाजल्यापासून बैठका मारायला सुरूवात केली. सकाळी 9.15 वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सूरू होईपर्यंत त्यांनी ११ हजार ४०० बैठका मारल्या. या कालावधीत ५५७५ बैठका मारण्याचा प्रयत्न करणार होते. त्यापेक्षा दुप्पट बैठका मारून विक्रम केला आहे. यापूर्वी विश्वनाथ पाटील यांनी वयाच्या ५० व्या ६२१५ बैठका मारण्याचा विक्रम केला होता.
वयाच्या ५४ वर्षी ३२५४ सूर्यनमस्कार मारले होते. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी ३० हजार ७२० दोरीउड्या मारण्याचा विक्रम केला होता. वयाच्या ५८ व्या वर्षी पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्त होण्याच्या दिवशी अलिबाग ते पेण व परत पेण ते आलिबाग असा न थांबता ६४ किमी धावण्याचा विक्रम देखील त्यांनी केला होता. भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनामित्त विश्वनाथ पाटील ५५७५ बैठका मारण्याचा प्रयत्न करणार होते. तो पूर्ण होऊन दुप्पट बैठका मारल्या. त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदविला गेला आहे.