निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचाऱ्यांची सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:50 AM2018-04-03T06:50:51+5:302018-04-03T06:50:51+5:30
- जिल्ह्यातील बहुतांश मजूर सहकारी संस्थांमध्ये निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगणारे हे सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंदवले गेले आहेत. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून दोन्ही बाजूंनी लाभ लाटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अलिबाग - जिल्ह्यातील बहुतांश मजूर सहकारी संस्थांमध्ये निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगणारे हे सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंदवले गेले आहेत. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून दोन्ही बाजूंनी लाभ लाटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांना माहितीच्या अधिकारामध्ये सदरची बाब उघड झाल्याने सहकार चळवळही पोखरली जात असल्याचे अधोरेखित होत आहे. मजूर सहकारी संस्थांसाठीचा सभासद हा मजूर वर्गातील म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीने व शारीरिक श्रमाची कामे करणारी व्यक्ती असली पाहिजे. त्या व्यक्तीच्या उपजीविकेचे प्रमुख साधन हे मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. ती व्यक्ती शारीरिक श्रमातून मजुरी करणारी असली पाहिजे अशा अटी आहेत. परंतु रायगड जिल्ह्यामधील बहुतांशी नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसते.
सरकारी निवृत्ती वेतन घेणारे निवृत्त कर्मचारी, निवृत्त शिक्षक व करोडोंची मालमत्ता असणारे व्यक्ती मजूर म्हणून नोंदविले गेल्याचे समोर आले आहे. अनंत गोटीराम देशमुख हे सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्ती वेतन सुरू असल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन फक्त मजुरी नाही हे स्पष्ट होते. तरीही ते प्रबळगड मजूर सहकारी संस्था मर्यादित, हातनोली ता.खालापूर या मजूर संस्थेमध्ये ७३ व्या वर्षी देखील सभासद असल्याचे दिसून येते. त्यांची मजूर सदस्य क्र .१२८ अशी नोंद असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाने ठाकूर यांना दिलेल्या १६ फेब्रुवारी २०१८ च्या पत्रामध्ये नमूद केले आहे. मजुरांसाठीची विहित वयोमर्यादा ७० वर्षे असताना अनंतराव देशमुख, शंकर दादू म्हात्रे या मजुरांचे वय हे अनुक्र मे ७३ व ७५ असल्याचे दिसून येते.
शंकर दादू म्हात्रे, अनिल शांताराम पाटील, अनिल गोमा पाटील यांचे पुत्र अभिषेक अनिल पाटील, द्वारकानाथ नाईक यांचे पुत्र मृणाल नाईक, नाईक यांच्या सूनबाई ईशा मृणाल नाईक, मनोज हरिचंद्र भगत, नाझनिन अस्लम राऊत, आशा रामदास मालपाणी, निनाद विकास पाटील त्याचप्रमाणे साईधाम मजूर सहकारी संस्था मर्या. श्रीबाग, ता.अलिबागमधील मजूर ज्योती प्रकाश म्हात्रे या रायगड मजूर फेडरेशनमधील कर्मचारी प्रकाश वसंत म्हात्रे यांच्या पत्नी आहेत.
सहायक निबंधकांनी मागवला अहवाल
जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक यांच्याकडून नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थामधील संस्थांच्या लेखापरीक्षण अहवालामधील मजुरांची यादी, मजूर सभासदांचे पत्ते, संस्थेचे कार्यक्षेत्र या मजूर सभासदांनी जोडलेल्या तलाठी अथवा तहसीलदार यांच्याकडील अ धारिकेतील मजूर दाखल्याची प्रत, या मजूर सभासदांना सहायक निबंधक कार्यालयाने दिलेली मंजुरीची पत्रे व मजूर सहकारी संस्थांचे नोंदणीकृत पत्ते ही माहिती तत्काळ जिल्हा उपनिबंधक यांनी संकलित करून आपल्याला द्यावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांनी या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक यांच्याकडून तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे.