गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू; मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 10:56 PM2019-09-08T22:56:52+5:302019-09-08T22:57:31+5:30
गर्दीच्या ठिकाणी रस्त्याला दुभाजक लावून एके री वाहतूक
अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर आता चाकरमान्यांना वेध लागले आहेत ते परतीच्या प्रवासाचे. परतीचा प्रवास करताना चाकरमान्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी चांगलीच उपाययोजना केली आहे. सुमारे ३५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत.
जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन आणि पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यात आल्याने गणेशभक्तांचा परतीचा प्रवास विनाविघ्न पार पडण्यास आता मदत मिळणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती, त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास या वेळी प्रवाशांना जाणवला नाही. पोलिसांनी विशेष खबरदारी घेत महत्त्वाच्या स्पॉटवर सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत
स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बाप्पाच्या आगमनाच्या वेळी गणेशभक्तांना त्यांच्या घरी सण साजरा करण्यासाठी वेळेत जाता यावे, यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन योग्य होते. त्यामुळे कोठेही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन भक्तांना तासन्तास अडकून पडावे लागले नसल्याकडेही वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लक्ष वेढले. सध्या पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे कोठेही वाहतूककोंडी होताना दिसत नाही. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, असेही त्यांनी सांगितले.
मरुड आगारातून सोडल्या जादा गाड्या
गणेशमूर्ती विसर्जन होताच त्याच दिवशी रात्रीच्या गाडीचे बुकिंग अगोदरच केल्याने चाकरमान्यांचा पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला. या वेळी मुरुड आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी, प्रवाशांना कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी जास्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांना वेळेत गाडी मिळत होती. मुरुड तालुक्यातून हजारो चाकरमान्यांनी अगोदरच आरक्षण केल्याने एसटी महामंडळाला जास्त गाड्यांची व्यवस्था करावी लागली.
कर्जत आगारातून दहा गाड्या देण्यात आल्या होत्या, तर मुरुड आगाराच्या स्वत:च्या ४५ गाड्या मुंबई, बोरीवली, नालासोपारा, भाइंदर, कल्याण, ठाणे व विरार आदी ठिकाणच्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हजारो लोकांनी एसटी महामंडळ ाच्या गाड्यांमधून जाणेच अधिक पसंद केले आहे, त्यामुळे मुरुड आगारात प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे.
गणपती उत्सवासाठी हजारो लोक आपल्या गावी आले होते, पाच दिवसांचे विसर्जन होताच चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केल्याने सर्व थांब्यावर मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. प्रवाशांच्या अफाट गर्दीने मुरुड आगाराला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण प्रवास करणारे थेट प्रवास करीत आहेत, याबाबत अधिक माहिती सांगताना आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी शनिवारी रात्री मुंबईसाठी एकूण तीन गाड्या सोडण्यात आल्या तर रविवारसाठी चार रातराणी गाड्या मुंबईसाठी पाठवत असल्याचे सांगितले.
सर्व प्रवासी थेट प्रवास करणारे असून मुरुड आगार प्रवाशांची योग्य काळजी घेत आहेत.
पर्यायी मार्गाचा वापर
१) गणेशमूर्ती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे, तसेच वाहतूककोंडी होऊ नये याकरिता माणगावमधून काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करावे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एसटीचे आरक्षण फुल्ल
२) आगरदांडा : गणेश चतुर्थीनिमित्ताने हजारो चाकरमानी दाखल झाले होते. गणेशोत्सवासाठी दाखल झालेले चाकरमानी पुन्हा नोकरी-धंद्यासाठी मुंबई, पुणे, कल्याण व अन्य शहरांमध्ये माघारी फिरू लागले आहेत. बाप्पाची मनोभावे पूजा करून विसर्जन केल्यानंतर पुन्हा एकदा मिळेल त्या वाहनाने, त्यामध्ये एसटी व खासगी वाहनाने परतीचा प्रवास चाकरमान्यांनी सुरू के ला आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पुन्हा परतीचा प्रवास करत चाकरमानी मुंबई, कल्याण, पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे मुरुड परिवहन मंडळाच्या स्थानकांवर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या हजारो चाकरमान्यांसाठी परिवहन विभाग सज्ज झाला आहे.
रविवारी पाच ग्रुप बुकिंग असल्याने पाच गाड्या मुंबई तर आजच्या दिवसात १८ अधिकच्या गाड्या बोरीवली, नालासोपारा, भाइंदर, कल्याण व ठाणे आदी ठिकाणी रवाना होणार आहेत. प्रवाशांनी आगोदरच बुकिंग के ल्याने सोमवारी ११ जादा गाड्या सोडणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा याची दक्षता मुरुड आगाराकडून घेतली जात असल्याचे या
वेळी सांगितले. हजारोच्या संख्येने चाकरमान्यांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केल्याने सर्वच थांब्यावर गर्दीच गर्दी दिसत आहे.