चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 09:02 AM2024-08-31T09:02:58+5:302024-08-31T09:03:22+5:30

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

Revas Bhaucha dhhakka boat service starts from tomorrow now go by boat without hesitation for Ganapati | चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोटसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच उरण-भाऊचा धक्कादरम्यान वाढविण्यात आलेल्या तिकीटदरात १५ रुपयांची कपात केली आहे. यामुळे गणपतीसाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकीटदरात वाढ केली जाते. त्यामुळे दि. २६ मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकीट दरात ८० रुपयांवरून १०५ अशी १५ रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर १ सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकीट दरात १५ रुपये कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकीट दर प्रौढांसाठी ८०, तर लहानांसाठी ३९ रुपये आकारण्यात येणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब हवामान, पाऊस, समुद्रातील उंच लाटामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक जून ते ऑगस्ट अशी बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी बोटसेवाही १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 
- जमीर बामणे, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था

Web Title: Revas Bhaucha dhhakka boat service starts from tomorrow now go by boat without hesitation for Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.