लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोटसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच उरण-भाऊचा धक्कादरम्यान वाढविण्यात आलेल्या तिकीटदरात १५ रुपयांची कपात केली आहे. यामुळे गणपतीसाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकीटदरात वाढ केली जाते. त्यामुळे दि. २६ मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकीट दरात ८० रुपयांवरून १०५ अशी १५ रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर १ सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकीट दरात १५ रुपये कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकीट दर प्रौढांसाठी ८०, तर लहानांसाठी ३९ रुपये आकारण्यात येणार आहे.
वारंवार बदलणारे वादळी व खराब हवामान, पाऊस, समुद्रातील उंच लाटामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक जून ते ऑगस्ट अशी बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी बोटसेवाही १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. - जमीर बामणे, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था