रेवदंडा : गेले काही महिने रेवदंडा समुद्रकिनारी बीच कॅँपिंग व्यवसाय इतका चुकीच्या पद्धतीने फोफावला होता की गैरप्रकार वाढीस लागल्याच्या तक्रारी विविध शासकीय कार्यालयात लेखी स्वरूपात पोहोचल्या असताना या व्यवसायातून पर्यटकांचा माहोल वाढत चालला होता; मात्र शासकीय कार्यालयाकडे या व्यवसायाबद्दल काय निर्णय होत आहे याबाबत लक्ष लागून राहिले होते. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली. ही कारवाई महसूल खाते, पोलीस यंत्रणा,मेरीटाईम बोर्ड, वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत या सर्वांच्या संयुक्तपणे करण्यात आली.
कारवाई अलिबागचे उपविभागीय अधिकारी मैनाक घोष व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. किनाऱ्यावर असलेल्या सुमारे ५८ पर्यटन व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक तहसीलदारांनी दिली.ही कारवाई होणार असल्याने सकाळी आठ वाजता पोलीस यंत्रणा इतकी सक्षमतेने रस्त्यावर व किनारपट्टीवर असल्याने ग्रामस्थांना गावात काहीतरी घडले आहे का अशी शंका वाटू लागली, पण थोड्यावेळात ही कारवाई होणार आहे हे लक्षात येताच ग्रामस्थांचे लक्ष उभारलेल्या टेंट व पक्क्या बांधलेल्या इमारतींकडे गेले.