'पाच दिवसांचा आठवडा तरी महसूल विभाग ३६५ दिवस व्यस्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:12 PM2020-02-28T23:12:16+5:302020-02-28T23:13:18+5:30
बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन; कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा नोगोठणेत शुभारंभ
नागोठणे : आज येथे कोतवालांपासून आयुक्तांपर्यंतचे अधिकारी एकत्र आले आहेत. प्रोटोकॉल विसरून सर्व खेळाडूंनी खेळत राहावे, असा सल्ला देताना थोरात यांनी शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला असला, तरी महसूल विभागाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ३६५ दिवस काम करावे लागत असल्याने स्पर्धेचे दोन-तीन दिवस आनंदाचे आहेत हे समजून मार्गक्रमण करावे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला शुक्रवारपासून येथील रिलायन्सच्या अंबानी फाउंडेशन शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धा तीन दिवस चालणार असून, उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या स्पर्धेच्या निमित्ताने महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयांपर्यंत सर्वच जण एकत्र आले असल्याने सर्वांनीच या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन थोरात यांनी केले.
कोकणातील सातही जिल्ह्यांची सातही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. मात्र, या स्पर्धेला या सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंनी भरभरून प्रतिसाद दिला असल्यामुळे ही स्पर्धा चुरशीचीच होईल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी व्यक्त केला. २०११ साली नागोठण्यात ही स्पर्धा झाली होती व त्यानंतर या वर्षी पुन्हा रायगडला ही संधी मिळाली आहे. स्पर्धेत सात जिल्ह्यांचे १५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. या वेळी खा. सुनील तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप, मधुकर पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
माणगाव येथे या क्रीडा संकुलासाठी
५० कोटींचा निधी-आदिती तटकरे
रायगड जिल्ह्यात क्रीडा संकुलची मागणी होती व त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. माणगाव येथे हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी शासनाकडून लवकरच ५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे व पाच वर्षांनी ही स्पर्धा माणगावला घेण्यात येईल, असा विश्वास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.