महसूल वसुलीत लाखोंची वाढ
By admin | Published: March 26, 2016 02:40 AM2016-03-26T02:40:11+5:302016-03-26T02:40:11+5:30
महाड तालुक्यात ठिकठिकाणी विनापरवाना डबर, वाळू, खडी, ग्रीट, मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर २०१५ - २०१६ या वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत महाड महसूल विभागाने
दासगाव : महाड तालुक्यात ठिकठिकाणी विनापरवाना डबर, वाळू, खडी, ग्रीट, मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर २०१५ - २०१६ या वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत महाड महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईमध्ये २८ लाख ४९ हजार ४४८ रुपये दंड स्वरूपात वसूल केले आहे. मात्र २०१४ - १५ अखेरपर्यंतच्या झालेल्या दंडात्मक कारवाईमध्ये झालेल्या वसुलीमध्ये यंदा १० लाख रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
वाळू, डोंगर, दगडखाणी, गौनखनिज ही शासनाची संपत्ती आहे. मात्र त्याच्या उत्खननासाठी महसूल विभागाकडून रीतसर रॉयल्टी परवाना घेणे गरजेचे आहे. महाड तालुक्यात अनेक ठिकाणी उत्खननासाठी परवानगी कमी घेऊन नियमापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात येते. मात्र २०१५ - १६ या वर्षामध्ये मार्च अखेरपर्यंत महाड तालुक्यात अनधिकृतपणे होणाऱ्या गौन खनिज उत्खनन व त्याची वाहतूक करणाऱ्यांवर महाड प्रांताधिकारी सुषमा सातपुते तसेच तहसीलदार संदीप कदम यांनी सर्व मंडळाधिकारी व सजेतील सर्व तलाठी यांच्यामार्फत धडक कारवाईची मोहीम हाती घेत एक वर्षात २०१६ मार्च अखेरपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन, डबर, ग्रीट,खडी मातीचे भराव तसेच इकोझोनमध्ये असलेल्या वीटभट्ट्यांवर अशा ९७ कारवाया करत महाड महसूल विभागाने शासनाच्या तिजोरीत २८ लाख ४९ हजार ४४८ रुपयांची भर पाडली आहे. गेल्या वर्षी २०१५ च्या मार्च अखेरपर्यंत एक वर्षाची दंडाची वसुली १८ लाख होती. परंतु या वर्षी १० लाखांनी वसुली वाढ झाल्याची माहिती महाड तहसीलदारांकडून देण्यात आली आहे. तसेच पुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्खनन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महसूल विभागाकडून नियमाप्रमाणे उत्खननास परवानगी देण्यात येते. मात्र परवानगीधारक कमी पैशाची रॉयल्टी घेऊन अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवतात. गेल्या वर्षी ९७ धडक कारवाया करत महाड महसूल विभागाने २८ लाखांची दंडात्मक वसुली केली आहे. यापुढेही अशाच प्रकारे अनधिकृत उत्खनन व त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच कारवाईची यापुढे मोहीम सुरूच राहील, अशी माहिती महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी दिली.