पाली : सुधागड तालुक्यात गौण खनिज उत्पन्नाच्या माध्यमातून महसूल विभागाने १ कोटी १० लाखांची वसुली केली आहे. सुधागड तालुक्यात गौण खनिजाच्या एकूण १० खाणी असून बहुतांश खाणी मालकांनी चुकीची माहिती देऊन स्वामित्वधन तहसील कार्यालयात भरले होते. यामध्ये ते शासनाची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून ईटीएस मशिनद्वारे सर्व खाणींची मोजणी करण्यात आली. सुरेंद्र पाटील यांची पिलोसरी येथे खनिज असून ६४ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. याविरोधात त्यांनी प्रांत कार्यालयाकडे २५ टक्के रक्कम भरून अपील केले आहे. त्यांच्या शेजारी असलेले असलम खान यांच्या येथे ईटीएस मशिनद्वारे मोजणी केली असता त्यांनी दिलेली माहिती व ईटीएस मशिनद्वारे मोजणी केलेल्याची माहिती यामध्ये फरक आढळून आल्यावर त्यांच्याकडून स्वामित्वधनाचे २५ लाख रु पये रक्कम वसूल करण्यात आले. भैरव येथील संजय सांगळे यांच्या दगड खाणीत देखील फरक आढळल्याने त्यांच्याकडून ४ लाख स्वामित्वधनाची वसुली करण्यात आली. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर येथे देखील गौण खनिज उत्खनन होत असते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून खनिज पट्टा अशी परवानगी घेतली आहे. त्यांच्याकडून देखील तालुकास्तरावर वसुली करण्यात आली आहे. तसेच विक्र म गोवर्धन म्हात्रे यांच्या मालकीच्या असलेल्या गौण खाणीमध्ये फरक आढळल्याने २ लाख रु पयांच्या स्वामित्वधनाची वसुली करण्यात आली. निर्मला रामचंद्र नाईक, पडघवली यांना देखील महसूल विभागाकडून दंड आकारण्यात आला होता, मात्र त्यांच्या मालकांनी याबाबत खुलासा दिला आहे. त्या खुलाशाबाबत महसूल विभाग चौकशी करीत आहे. गायकर, जलोटा आणि बाळकृष्ण वधावन (करंजघर) यांच्या खाणी सद्यस्थितीत बंद असल्याचे निदर्शनात येत आहे. ही माहिती तहसीलदार कार्यालयातून मिळाली.
गौण खनिज खाणींवर महसूलची कारवाई
By admin | Published: March 29, 2017 5:05 AM