मुंबई - इस्रायलमधून आलेल्या ज्यूं बांधवांच्या नौका कोकणात नौगावला लागल्या आणि भारत व ज्यू यांचं एक नवं नातं निर्माण झालं. तिकडे कोचीनलाही काही ज्यू नौकेतून येऊन थडकले. कोकणातल्या ज्यूं ना इथल्या लोकांनी आपलंसं केलं त्यांना ते बेने इस्रायली म्हणजे इस्रायलची लेकरे असं म्हणू लागले. मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
रेवदंड्याचे हे सिनेगॉग १८४२ साली बांधायला घेतले. त्याचे काम सहा वर्षे चालले आणि त्याचा वापर प्रार्थनेसाठी सुरु झाला. प्रत्येक सिनेगॉगला नाव असते त्याप्रमाणे या सिनेगॉगलाही नाव देण्यात आले आहे. इस्रायली बांधव याला 'बेथ एल' म्हणजे देवाचे घर म्हणून ओळखतात. १८७६ साली त्याची पहिली दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोलोमन शालेम शूराबी हे त्याचे पहिले हजान म्हणजे प्रार्थना सांगणारे, ग्रंथ वाचणारे एक प्रसिद्ध गृहस्थ होते. कोचीनमधील ज्यूंशी संपर्क असल्याने त्यांना कोचीकर असेही म्हटले जाई. शूराबी यांनी अलिबागच्या सिनेगॉगलाही आर्थिक मदत केली होती.
आज रेवदंडा गावात फार थोड्या संख्येने बेने इस्रायली समुदाय राहातो. एकेकाळी मोठ्या संख्येने व्यापारात आणि नोकर्यांमध्ये बेने इस्रायली लोक कार्यरत होते, आज मात्र स्थलांतरामुळे त्यांची संख्या कमी राहिली आहे. रेवदंडा बाजारपेठेपासून अगदी थोड्या अंतरावर असणार्या या सिनेगॉगला अलिबागला जाणार्या पर्यटकांनी नक्की भेट द्यावी .
अलिबागजवळचा घोडकातळ तुम्हाला माहिती आहे का ?