क्रांतिस्तंभाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:23 AM2018-04-28T06:23:48+5:302018-04-28T06:23:48+5:30
सुशोभीकरणाची गरज : प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : म्हसळा येथील पंचायत समितीच्या वास्तूच्या नूतनीकरणास २०१५मध्ये सुरुवात झाली असून, जवळपास दोन कोटी रु पयांचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
नूतनीकरणाचे काम चालू असताना पंचायत समितीच्या समोरील स्वातंत्र्य सैनिकस्तंभ (क्र ांतिस्तंभ) मात्र विकासापासून वंंचित राहिला असल्याची तक्रार माजी सभापती महादेव पाटील यांनी विशेष कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वास्तविक पंचायत समितीच्या वास्तूचे नूतनीकरण करताना, क्रांतिस्तंभाचेही नूतनीकरण होणे गरजेचे होते. मात्र, यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने क्रांतिस्तंभाची दैनावस्था झाली आहे.
स्वातंत्र्य सैनिकस्तंभाकरिता २००७-०८मध्ये तीन लाख रुपयांची तरतूद करून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, पंचायत समितीची जुनी वास्तू तोडताना या स्वातंत्र्य सैनिकस्तंभाच्या समोरील टाइल्स उखडलेल्या होत्या. परिसरातील विटाही निघाल्या आहेत. त्यामुळे क्रांतिस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून पाच लाख रुपयांची तरतूद करावी किंवा इमारतीच्या कामातून या स्तंभाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इमारतीच्या नूतनीकरणाबरोबरच या क्र ांतिस्तंभाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांचे प्रतीक म्हणून असलेला क्रांतीस्तंभ दुर्लक्षित राहणे, ही बाब क्लेशदायी आहे.
- महादेव पाटील, माजी सभापती
इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर या क्रांतिस्तंभाचेही सुशोभीकरण करणार आहोत, या बाबतीत जि.प.अध्यक्षा यांच्याकडे सदर बाबतीत पत्र व्यवहार केला आहे.
- मधुकर गायकर, उपसभापती
पंचायत समिती, म्हसळा