- आविष्कार देसाई
अलिबाग : रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. सरकारने चार हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिली. अलिबाग येथील पत्रकार परिषदेते ते बोलत होते. रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते.
राज्य कोरोनाच्या संकटातून जात असताना आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकणातील पर्यटन उद्योगाला नवीन आयाम प्राप्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे, असे तटकरे यांनी सांगितले. रेवस-रेडी प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करायचा आहे. त्यासाठी डिपीआर तयार करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे.
कामाच्या निविदा एका महिन्यात निघतील साधारणपणे सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून सागरी महामार्ग जाणार आहे. त्यामुळे तेथील पयर्टन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार असल्याने आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळेल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कठोर उपाय योजना करणारराज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. यासंबंधी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत सर्व पक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत. कोरोना वाढता आकडा हा चिंताजनक आहे. त्यामुळे आता कठोर उपाय योजना करण्यावाचून पर्याय नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कठोर उपाय योजना करताना राज्य आणि केंद्र सरकारकडे कोणत्या बाबींचा पाठपुरावा करायचा याबाबतही बैठकीत विचार विनिमय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.