जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

By निखिल म्हात्रे | Published: December 3, 2023 05:55 PM2023-12-03T17:55:28+5:302023-12-03T17:56:49+5:30

जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

rice area decreased in the district productivity increased | जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग  - वाढत्या औद्योगिकरणामुळे रायगड जिल्ह्यातील भात पिकाचे लागवड क्षेत्र घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भात पिकाची उत्पादकता वाढली आहे. अनियमित पावसामुळे यावर्षी भाताची उत्पादनात घट होईल असा अदांज व्यक्त केला जात होता. मात्र कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत भाताच्या उतादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

सरासरीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. पण पावसाचे प्रमाण अनियमित होते. जुन आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाच्या या अनियमीत पणामुळे भात पिकावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भात लागवड आणि कापणी प्रयोगावरून तसे झाल्याचे दिसून येत नाही.

रायगड जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टर येवढे भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यावर्षी यापैकी ८९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. वाढते औद्योगिकरण, मजुरांची कमतरता यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली. मात्र नैसर्गिक तसेच तांत्रिक संकट येऊनही जिल्ह्यातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात भाताची उत्पादकता तपासण्यासाठी कृषी विभागाकडून १५ तालुक्यात ३०० पिककापणी प्रयोग घेण्यात आले. अद्याप काही पिक कापणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पण जे अहवाल प्राप्त झाले. त्यात भाताची उत्पादकता वाढल्याचे दिसून आले आहे. मळणी आणि झोडपणीनंतर भाताची उत्पादकता प्रती हेक्टरी ४० क्विंटल येवढी मिळाली आहे. गेल्या वर्षी ही प्रती हेक्टरी ३८ क्विंटल येवढी होती. म्हणजेच यंदा हेक्टरी जवळपास २ क्विंटल उत्पादकता वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्षी भाताची उत्पादकता वाढल्याचे या पिक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षावरून सिध्द होत आहे.

जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन भाताचे उत्पादन -

रायगड जिल्ह्यात यंदा ८९ हजार ६०० हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. पिक कापणी नुसार सरासरी हेक्टरी ४० क्विंटल येवढे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच यावर्षी जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन येवढे विक्रमी भाताचे उत्पादन झाले आहे. राज्यातील इतर भागात परतीच्या पावसाचा फटका बसला असला तरी यावर्षी कोकणात परतीच्या पावसाचा फारसा त्रास झालेला नाही. त्यामुळे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकरी समाधानी आहेत.

कृषी विभागाने पिक कापणी प्रयोग घेतले होते. त्यात यावर्षी भाताची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे दिसून आले आहे. अजून काही तालुक्यांचे पिक कापणी प्रयोग अहवाल येणे बाकी आहे. पण यंदा भाताचे उत्पादन वाढेल असेल प्राप्त आकडेवारीवरून दिसते आहे. - उज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक, रायगड

Web Title: rice area decreased in the district productivity increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.