- जयंत धुळप अलिबाग : सध्या भात पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. दाणा भरण्याच्या काळात पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच जिल्ह्यात भातावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याने अखेरच्या टप्प्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.वाढते ऊन आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या भात जातीच्या पिकांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाड-पोलादपूरसह जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांत भात पिकावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, कृषी विभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याची माहिती महाड तालुक्यातील जिते गावातील प्रयोगशील शेतकरी मारुती कळंबे यांनी दिली आहे. जे शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात त्याच्याकडे कृषी विभागाचा माणूस पोहोचतो; परंतु प्रत्यक्षात सर्व भातशेतीचे सर्वेक्षण करण्याचे काम कृषी विभागाने करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.पावसाची उघडीप असल्याने उपलब्धतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाढते उन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या जातीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने अळी आढळल्यास दिलेल्या शिफारसीप्रमाणे फवारणी करावी. तसेच भातावर किंवा भाजीपाला व इतर पिकावर फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. लष्करी अळीचा उपद्रव भात पीककाढणीच्या वेळी होत असून त्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.तुडतुड्यांचाही प्रादुर्भावमादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी, भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत आणि भात पिकाचे नुकसान होते.या व्यतिरिक्त निळ्या भुंग्याचा देखील प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती अलिबाग येथील शेतकरी वसंत म्हात्रे यांनी दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून किडीच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.यंदाच्या खरीप हंगामातील ९३ टक्के पर्जन्यमान मंगळवारी पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. त्यापैकी ९३.७३ टक्के म्हणजे ४७ हजार १२९ मि.मी. पर्जन्यमान मंगळवारी सकाळी ८ वाजता पूर्ण झाले.पाली येथे सर्वात कमी ४८ टक्के पर्जन्यमानदरम्यान, म्हसळा येथे १०६ टक्के, पेण येथे १०५ टक्के, उरण येथे १०१ टक्के, माणगाव व तळा येथे १०२ टक्के, गिरिस्थान माथेरान येथे १५७ टक्के, कर्जत ९८ टक्के, महाड येथे ९७ टक्के, अलिबाग येथे ९६ टक्के, पनवेल येथे ९४ टक्के, रोहा येथे ८७ टक्के, पोलादपूर येथे ८३ टक्के, मुरुड व खालापूर येथे ८२ टक्के, श्रीवर्धन येथे ६८ टक्के, सुधागड-पाली येथे ४८ टक्के पर्जन्यमान झाले आहे.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात माहितीचा अभावजिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे, त्यातच करपा आणि खोडकिड्यांचा प्रादुर्भाव बहुतेक सर्व तालुक्यांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या कार्यालयातून भात पीक वस्तुस्थिती संदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
भात पिकावर करपा, खोडकिड्याचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:26 AM